आता मनसेचे 'मुंबई दूध'

राज्यभरात दूध भेसळीचा मुद्दा सदैव ऐरणीवर असताना मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाने 'मुंबई दूध' या नावाने दुधाचा नवा ब्रॅण्ड बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 16, 2011, 04:58 AM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

राज्यभरात दूध भेसळीचा मुद्दा सदैव ऐरणीवर असताना मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाने 'मुंबई दूध' या नावाने दुधाचा नवा ब्रॅण्ड बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लवकरच या ब्रॅण्डचे लोकार्पण होणार असल्याची माहिती स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष सुनील बसाखेत्रे, सरचिटणीस राजन गावंड यांनी ठाण्यात दिली.

 

शिववड्याच्या माध्यमातून मराठी माणसाला रोजगार मिळवून देण्याचा शिवसेनेचा उपक्रम पुरता फसला असतानाच आता त्याच ध्येयासाठी मनसेने दूध विक्रीची मोहीम हाती घेतली आहे. गोकुळ, अमूल, वारणा, महानंदा यांच्याशी 'मुंबई दूध'ला सामना करावा लागणार आहे. 'मुंबई दूध- स्वाद महाराष्ट्राचा' या नावाने बाजारात येणाऱ्या या दुधाची माहिती ठाण्यात पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

राजन गावंड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई नॅचरल डेअरी फूड्स अॅण्ड बेव्हरेजेस प्रा. लि. या नावाने संस्थेची स्थापना केली आहे. संगमनेर, कोल्हापूर, सांगली, गडहिंग्लज या भागांतील दूध उत्पादकांकडून थेट दूध संकलीत केले जाणार आहे. या दुधावरील प्रक्रिया आणि कोल्ड स्टोअरेजसाठी मरोळ आणि संगमनेर येथे प्लाण्ट उभारण्यात आल्याची माहिती राजन गावंड यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात दररोज ४० ते ५० हजार लिटर दूध पुरवठा करण्याचे मनसेचे टार्गेट आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि पनवेल या शहरांमध्ये सुरुवातीला हे दूध उपलब्ध होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभर दूध वितरणाचे नेटवर्क उभारले जाईल. पुढल्या टप्प्यात दही, लोणी, तूप, श्रीखंड, आईस्क्रीम, चीज अशा दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेचीदेखील तयारी असल्याचे गावंड यांनी सांगितले.

 

मुंबईत प्रत्येक वॉर्डासाठी एक, तर ठाण्यात तीन प्रभागांसाठी एक याप्रमाणे मुख्य वितरकाची नेमणूक केली जाणार आहे. दूध वितरकांच्या मागण्यांचा विचार करून या वितरण प्रक्रियेतील कमिशन निश्चित करण्यात आले आहे. मुख्य वितरकाला प्रती लिटर अडीच रुपये, त्याखालोखाल दीड रुपये आणि किरकोळ विक्रेत्यांना एक रुपयांपर्यंत कमिशन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. अन्य कोणत्याही दूध कंपन्यांएवढाच मनसेच्या दुधाचा दर असला, तरी वितरकांना मिळणारे कमिशन मात्र सर्वाधिक असेल असेही गावंड यांनी सांगितले.

 

मराठी तरुणांना रोजगार मिळवा हा या दूध वितरण मोहिमेचा मुख्य उद्देश आहे . त्यामुळे वितरण प्रक्रियेत मराठी माणसालाच सामावून घेतले जाणार आहे . त्यातही महिला बचत गटांनी या व्यवसायात दाखल व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.