प्रदीप जैस्वाल पुन्हा सेनेच्या मार्गावर?

दीड वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार प्रदीप जैस्वाल स्वगृही परतण्याच्या विचारात आहेत. खासदार चंद्रकांत खैरे यांनी तसे संकेत दिल्यानंतर आमदार किशनचंद तनवाणी, संजय शिरसाट यांनी यासाठी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. स्वत: जैस्वाल यांनी मात्र याचा इन्कार केला. शिवसेनेत जाण्याचा सध्या तरी विचार नाही, असे जैस्वार यांनी स्पष्ट केले.

Updated: Oct 31, 2011, 03:42 PM IST

झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद

दीड वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार प्रदीप जैस्वाल स्वगृही परतण्याच्या विचारात आहेत. खासदार चंद्रकांत खैरे यांनी तसे संकेत दिल्यानंतर आमदार किशनचंद तनवाणी, संजय शिरसाट यांनी यासाठी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. स्वत: जैस्वाल यांनी मात्र याचा इन्कार केला. शिवसेनेत जाण्याचा सध्या तरी विचार नाही, असे जैस्वार यांनी स्पष्ट केले.
पॉवरफुल नेते अशी प्रतिमा असलेल्या जैस्वाल यांना शिवसेनेत परत आणावे, अशी भावना असलेला पक्षात मोठा गट आहे. औरंगाबाद लोकसभा किंवा मध्य विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सुरू केली. त्यावरून खैरे-दानवेंमधील दुही वाढीस लागल्यावर हा गट अधिक सक्रिय झाला आहे.

त्यासाठी वातावरण निर्मितीकरिता जैस्वाल यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडण्यात आला. नरेंद्र अग्रवाल या शिवसैनिकाने वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रात  दिलेल्या जाहिरातीने या चर्चेला अधिकच उधाण आले.

खैरे, आमदार किशनचंद तनवाणी, संजय शिरसाट यांची छायाचित्रे जाहिरातीमध्ये असल्याने हे तिघेजण त्यांच्यासाठी पुढाकार घेत असल्याच्या चर्चेलाही एकप्रकारे दुजोरा मिळाला.

२००९च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने जैस्वाल शिवसेनेबाहेर पडले. या निवडणुकीत ते विजयी झाले आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. शहर प्रगती आघाडी स्थापन करून युतीच्या विरोधात त्यांनी  मनपा निवडणूकही लढविली.   त्यात त्यांना फारसे यश आले नाही. तरीही त्यांच्या क्षमतेची पूर्ण कल्पना असल्याने त्यांना परत आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.