www.24taas.com, भोपाळ
स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त मध्यप्रदेश सरकारने सर्वाधिक सूर्य नमस्कार घालण्याच्या जागतिक विक्रमाची नोंद व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु केले असले तरी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी त्या विरोधात फतवा जारी केला आहे. आता तर ख्रिश्चन समुदायानेही विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, मुस्लीम नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही मध्यप्रदेश सरकार वार्षिक राज्यस्तरीय सूर्यनमस्कार कार्यक्रमावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम होण्याचे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेत. ख्रिश्चन समुदायाने म्हटले आहे की, सूर्य नमस्कार ही धार्मिक क्रिया आहे. मात्र, सूर्याला ईश्वर मानले जात नाही. तसेत सरकारने अन्य मुद्द्यांवर भर दिला पाहिजे. शिक्षणावर भर देण्यासाठी लक्ष द्यावे, असा सल्लाही ख्रिश्चन समुदायाने सरकारला दिला आहे.
मोठ्या प्रमाणावर आणि ठिकठिकाणी ऍरोबॅटीक स्पर्धा घेण्याचा विक्रम सध्या कझाकस्तानच्या नावावर आहे. मध्यप्रदेश सरकार सूर्यनमस्कार कार्यक्रमावर ठाम राहिल्याने तो विक्रम मोडला जाण्याची शक्याता आहे. मध्यप्रदेशातील ५० लाख विद्यार्थ्यांसह १ कोटी पेक्षा जास्त नागरिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
दरम्यान, सूर्य नमस्कार घालणे हा मूर्ती पूजेसारखाच प्रकार असल्याने ते इस्लामच्या विरोधात आहे आणि त्याला इस्लामनुसार मनाई असल्याचं मुस्लिम नेत्यांचे म्हणणं आहे. मुस्लिम नेतृत्वाने त्या विरोधात फतवा जारी केला आहे. शहर काझी सय्यद मुश्ताक अली नदवी यांनी त्यावर शिक्कामोर्तबही केलं आहे.
मध्यप्रदेश सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सर्वाधिक सूर्य नमस्कारांच्या विक्रमांची नोंद गिनीज बुक होण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सहभाग अनिवार्य नसल्याचं स्पष्टीकरण जारी केलं आहे. मुस्लीम नेत्यांच्या विरोधाला न जुमानता शिवराजसिंह चौहान सरकारने सूर्यनमस्कार कार्यक्रम मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यप्रदेशातील सूर्यनमस्कार प्रकरणी आरएसएस, भाजप आणि जमात-ए-इस्लामी यांमध्ये मॅच फिक्सिं ग झाले आहे. सूर्यनमस्कार हा योगाचा प्रकार आहे. त्याचा धर्माशी संबंध नाही, असे कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह ट्विटरवर म्हणाले. तर मध्य प्रदेशच्या शालेय शिक्षण मंत्री अर्चना चिटणीस यांनी पत्रकारांना सांगितलं की, प्रकृती स्वास्थ सुधारण्यासाठी सूर्य नमस्कार हा योग व्यायामाचा प्रकार आहे. आणि ज्यांना यात रस नसेल त्यांना त्यात सहभागी न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सूर्य भगवा किंवा हिरवा नसल्याची टिपण्णीही त्यांनी केली. मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी मात्र शिक्षणाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न असल्याचा म्हटलं आहे.