दिल्ली न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

एकाद्या व्यक्तीने दुसरा विवाह केला असला तरी त्याला स्वत:च्या मुलाचा ताबा नाकारता येणार नसल्याचं निकाल दिल्लीच्या एका न्यायालयाने दिला आहे. न्यायालयासमोरील खटल्यात त्या याचिकाकर्त्याचा मुलगा त्याच्या आईच्या निधनानंतर आपल्या आजी आजोबांकडे राहत होता.

Updated: Nov 6, 2011, 12:43 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

एकाद्या व्यक्तीने दुसरा विवाह केला असला तरी त्याला स्वत:च्या मुलाचा ताबा नाकारता येणार नसल्याचं निकाल दिल्लीच्या एका न्यायालयाने दिला आहे. न्यायालयासमोरील खटल्यात त्या याचिकाकर्त्याचा मुलगा त्याच्या आईच्या निधनानंतर आपल्या आजी आजोबांकडे राहत होता.
न्यायाधीश गौतम मनन यांनी दहा वर्षे वयाच्या मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केला आहे. मुलाच्या आजी आजोबांनी त्याच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह केला. त्यामुळे सावत्र आईच्या ताब्यात देणं मुलाच्या हिताचं होणार नसल्याचं दावा न्यायाधीशांनी फेटाळून लावला. याचिकाकर्त्याने केलेला दुसरा विवाह हा मुलाचा ताबा मिळण्यात अडसर ठरु शकत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. या व्यक्तीची मोठी मुलगी आपल्या सावत्र आईसमवेत राहत असून तिचे संगोपन व्यवस्थित करण्यात आल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. याचिकाकर्त्याने मुलाचा कायमस्वरुपी ताबा मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुलाचे आजी आजोबी वयोवृध्द असून त्यांच्यात आणि नातवाच्या वयात बरंच अंतर असल्याचंही तसंच त्यांच्या पाच अविवाहीत मुलांची जबाबदारी असल्याचं न्यायालयाने निकालपत्रात नमुद केलं आहे. तसंच या मुलांपैकी कोणीही त्यांच्या नातवाचा सांभाळ करण्यास पुढाकार घेतला नसल्याचं कारण न्यायालयाने दिलं. न्यायालयाने मुलाचा ताबा वडिलांकडे देताना त्याच्या आजी आजोबांना महिन्यातून दोनदा भेटण्याची परवानगी दिली. याचिकाकर्त्याने आपला विवाह १९९८ साली झाल्यानंतर १९९९ साली मुलीचा आणि २००१ साली मुलाचा जन्म झाला. तसंच २००२ साली आजारपणात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा आपल्या आजी आजोबांकडे राहत होता अशी माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने या व्यक्तीच्या विरोधात पत्नीचा छळ केल्याची तक्रार दाखल झाल्याचं प्रतिवादींचा दावाही या प्रकरणी त्याची सुटका झाल्याचं सांगत फेटाळली.