www.24taas.com, नवी दिल्ली
पंतप्रधानांवर टीम इंडियाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना पाच पानांचं सविस्तर पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात टीम अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी मागणी आणि कोळसा खाण प्रकरणातील पंतप्रधानांचा भ्रष्टाचार यांचं उत्तर दिलं आहे. टीम अण्णांनी कुठलाही पुरावा नसताना पंतप्रधानांवर आरोप केल्याचे लिहिण्यात आलं आहे.
राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी पंतप्रधानांच्या पत्रासंबंधी माहिती दिली. केंद्र सरकारमधील १५ मंत्र्यांवर टीम अण्णांनी केलेल्या आरोपांना अमान्य करत एसआयटी तपासणीलाही पंतप्रधानांनी विरोध केला आहे. तसंच केंद्र सरकारने मुलायम सिंग यांच्यावर चालू असणाऱ्या सीबीआय तपासणीलाही दाबून टाकलं आहे, या टीम अण्णांच्या आरोपांनाही नकार दिला आहे.
याशिवाय, खासदारांवरील आरोपांसाठी वेगळ्या फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणीही पंतप्रधानांनी फेटाळली. ‘टीम अण्णा मनात येतील ते आरोप करू शकत नाहीत. तसंच टीम अण्णांनी ज्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले आहेत, ती भाषा आम्हाला मंजूर नाही’, असंही व्ही नारायणसामी म्हणाले.