गोंधळ घालून दमलेल्या खासदारांना 'ऍपल'

संसदेत खासदारांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडलं असलं तरी त्यांचे लाड काही अजून कमी झालेले नाहीत. लोकसभेत कामकाज पेपरविरहीत आणि टेक सॅवी व्हावं यासाठी प्रत्येक खासदारला आयपॅड घेण्यासाठी ५०,००० रुपये लोकसभेच्या सचिवालयाने मंजूर केलेत.

Updated: Dec 1, 2011, 03:06 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
संसदेत खासदारांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडलं असलं तरी त्यांचे लाड काही अजून कमी झालेले नाहीत. लोकसभेत कामकाज पेपरविरहीत आणि टेक सॅवी व्हावं यासाठी प्रत्येक खासदारला आयपॅड घेण्यासाठी ५०,००० रुपये लोकसभेच्या सचिवालयाने मंजूर केलेत.

आम्ही खासदारांना आयपॅड घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कागदाची बचत होईल असं लोकसभेचे सेक्रेटरी जनरल टी.के.विश्वनाथन यांनी सांगितलं. खासदारांनी ऍपल आयपॅड किंवा अँड्रोईडवर आधारीत सॅमसंग गॅलक्सी टॅब या पर्यायांपैकी एक विकत घेऊ शकतात असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लोकसभा कमिटीने पेपरविरहीत कार्यालयाच्या संदर्भात निर्णय घेतल्यानंतर खासदारांना या फोनच्या वापर कसा करावा याची माहिती करुन देण्यात आली.

लोकसभेच्या अधिकाऱ्यांच्या मते दररोज नोटीस, इमेल, प्रश्न आणि उत्तरे तसंच सदनातील कामकाजाचा तपशील छापील स्वरुपात खासदारांना पाठवावा लागतो. खासदारांनी ही माहिती आयपॅडवर डिजीटल स्वरुपात तपासायला सुरवात केली तर यासाठी लागणाऱ्या कागदाची बचत होईल.

लोकसभा सचिवालयाने डिजीटलवर भर देण्याच्या उद्देशाने छापील रिपोर्टच्या संख्येत कपात करत त्या ऐवजी वेबसाईटवर अपलोड करण्यास सुरवात केली आहे. खासदार हे रिपोर्ट डाऊनलोड करुन त्याच्या प्रिंट काढू शकतात.

संसदेच्या काही भागांमध्ये वायफाय कनेक्शनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे सदनाचे कामकाज थेट पाहता येऊ शकेल आणि रिपोर्ट पाहता येतील. राज्यसभेच्या काही विभागांमध्ये वायफायची सुविधा याआधीच उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Tags: