www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत जंतरमंतरवर टीम अण्णांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनाला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. अण्णा हजारे उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. अण्णा हजारे सकाळी ११ वाजता जंतरमंतरवरील मुख्य मंचावरती पोहचले. अण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय. आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, ना कोणता पक्ष काढणार... लोकपाल बिलासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.
अण्णा हजारे उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. जंतरमंतरवरती फक्त ३५० ते ४०० लोकांचीच गर्दी दिसत आहे. लोकांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी टिम अण्णा वेगवेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. देशभक्तीपर गाणी लावून गर्दी जमवणयाचाही प्रयत्न चालू आहे. सुट्टी असल्याने लहान-लहान घोळक्याने लोक येत आहेत. काही प्रमाणात महिला, विद्यार्थी यांची गर्दी दिसत आहे. आंदोलन ठिकाणावरुन किरण बेदी काल गायब होत्या आज मात्र पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी दिसल्या.
सरकारनं मात्र अजूनही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. टीम अण्णांच्या आंदोलनाला सरकारी पातळीवर अद्याप कुठलाही प्रतिसाद दिला गेलेला नाही. टीम अण्णाचे सदस्य उपोषणाला बसलेत मात्र व्यासपीठावर ते पूर्ण दिवस नसतात. त्यामुळं अरविंद केजरीवाल यांचं दर्शन व्हावं, असे फलकही मैदानावर पाहायला मिळत आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांनी काल उपोषणस्थळी भेट दिली होती. भ्रष्ट मंत्री, भ्रष्टाचार, लोकपाल या मुद्यांवरुन टीम अण्णांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलंय. मात्र, दिल्ली आणि मुंबईत त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही.
.