आता खाद्य तेलाच्या किंमतीही वाढणार

महागाईनी आधीच खचलेल्या सामान्य माणसाला आता अजून महागाईला सामोरं जावं लागणार आहे. खाद्यतेल २ ते ३ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांत खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ दिसून येते आहे.

Updated: May 2, 2012, 08:04 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

महागाईनी आधीच खचलेल्या सामान्य माणसाला आता अजून महागाईला सामोरं जावं लागणार आहे. खाद्यतेल २ ते ३ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांत खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि मोहरीच्या उत्पादनात झालेली घट या भाववाढीला कारणीभूत ठरते आहे.

 

भाज्या, दुधासह जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या वणव्यात आता खाद्यतेलाचीही भर पडली आहे. गेल्या तीन महिन्यात खाद्य तेलाच्या किंमतीत ८ ते १० रूपयांनी वाढ झाली आहे.बाजारात तेलाच्या किमंतीत मोठी वाढ पहायला मिळाली आहे. एक किलो सोयाबीन तेलासाठी सत्तर रूपये माजावे लागत होते आता त्याच एक किलो तेलासाठी एकोणऐंशी  रूपये मोजावे लागत आहेत. तर मोहोरीच्या एक किलो तेलाचा भाव ७४ वरून ८१ वर पोहोचला आहे. सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे.

 

एक किलो सूर्यफुलाच्या तेलाचे भाव ६९ वरून ७४ रूपये प्रतिकिलो झाले आहेत. तर पामोलीन तेलाच्या किमंती ५७ रूपयांवरून ६६, रूपये प्रतिकिलो झाल्या आहेतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या उत्पादनात आलेली  घट हे या भाववाढी मागचं प्रमुख कारण आहे. अर्जेंटीना आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये २०० लाख टन तर उत्तर अमेरीकेत ७० लाख टन उत्पादन घटलं आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत खाद्य तेलांच्या किमंतीत ५३ टक्के वाढ पहायला मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव  प्रति क्विंटल  २४०० रूपये एवढा होता.

 

त्यात वाढ होऊन आता हा भाव ३६७५ रूपये प्रति क्विंटल इतका झाला आहे. तर मलेशियात माप तेलाच्या किंमतीत झालेली वाढ जगातील इतर बाजारांमध्येही तेलाच्या किंमती वाढणार हेच दर्शवत आहे. तसचं मोहोरीच्या उत्पादनातील घट आणि डॉलर प्रति रूपयाचं घटणारं मुल्य हे सुध्दा या भाववाढीला कारणीभूत ठरत आहे.