झी २४ तास वेब टीम, पणजी
गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. हजारो कोटींच्या खाण घोटाळ्यासंदर्भातील सार्वजनिक लोक लेखा समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला महत्त्व आलं आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावरही खाणकाम घोटाळ्याचे आरोप होत असल्यानं भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय.
तसंच कामत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळतलं हे शेवटच अधिवेशन असल्यानं भाजप सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक झालं आहे. भ्रष्टाचार आणि खाण घोटाळ्यावरून भाजप आज मोर्चाही काढणार आहे. त्यामुळं सत्ताधा-यांना विरोधक जेरीस आणतात का? याचीच उत्सुकता आहे...तसंच याच अधिवेशनात लोकायुक्त बील सादर होत असल्यानं हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे...