काश्मिरी आमदाराच्या 'पंखा'ला बळ

आज जम्मू-काश्मीर विधानसभेत उडालेल्या गोंधळात विधानसभा अध्यक्षांनी संतप्त विरोधकांना शांत करण्याऐवजी त्यांच्यावर असंसदीय शब्दांचा मारा केल्याने एका सदस्याने त्यांना पंखा फेकून मारण्याचा प्रयत्न केला.

Updated: Oct 9, 2011, 01:12 PM IST

झी २४ तास वेब टीम, श्रीनगर

नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते सय्यद मोहम्मद युसूफ शाह यांच्या पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यूच्या चौकशीच्या मागणीवरून आज जम्मू-काश्मीर विधानसभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ उडाला. विधानसभा अध्यक्षांनी संतप्त विरोधकांना शांत करण्याऐवजी त्यांच्यावर असंसदीय शब्दांचा मारा केल्याने एका सदस्याने त्यांना पंखा फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
शाहच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करताना विरोधक संतप्त झाले होते. पीडीपीचे आमदार इफ्तिकार हुसैन अन्सारी यांनी तीव्र शब्दांमध्ये शाह यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांच्या अटकेची मागणी केली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीमध्ये अध्यक्षांनी त्यांच्यावर असंसदीय शब्दांचा मारा केला.

 

त्यावेळी संतप्त होत अन्सारी यांनी टेबलाजवळील उभा पंखा त्यांच्या दिशेने भिरकावला. सुदैवाने पंखा तुटून तो तेथेच पडला आणि अध्यक्ष बचावले. ‘मी त्यांना मारण्याच्या उद्देशानेच पंखा उचलला होता पण अल्लाच्या मेहरबानीमुळे ते बचावले,’ असे अन्सारी यांनी नंतर सांगितले. अध्यक्ष मोहम्मद अकबर लोने यांनी नंतर, असंसदीय शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अन्सारी यांनी उचकविल्यामुळेच आपला तोल गेला आणि आपण असंसदीय शब्द वापरले. अध्यक्ष म्हणून तसे वागणे अयोग्य होते, हे आपणास जाणवले असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते नंतर म्हणाले. सभागृहात पंखा फेकण्याचा आणि शिव्या घालण्याचा प्रकार झाला तेव्हा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सभागृहात शांतपणे बसून हा प्रकार पाहत होते.

 
शाह यांचा शुक्रवारी पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला, त्याची माहिती सभागृहाला देण्याच्या मागणीवरून हे प्रकरण घडले. दोघा पक्ष सदस्यांना सरकारमध्ये मोठे पद देण्याचे आश्वासन देत शाह यांनी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतल्याच्या आरोपावरून अब्दुल्ला यांनी त्यांना गुन्हा अन्वेषण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले होते. ओमर यांनी या प्रकरणात स्वतला न्यायाधीश बनवून ‘निकाल’ दिला आणि त्यांनीच शाह यांना मारहाण केली, असा आरोप पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केला.

 

आपला संपूर्ण विश्वास न्यायाधिकरणावर आणि न्यायिक चौकशीवर आहे. आपण कोणत्याही आयोगासमोर या बाबत आपली बाजू मांडण्यास तयार असून त्यांच्या सर्व प्रश्नांना आपण उत्तरे देऊ, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. मेहबूबा मुफ्ती यांच्या आरोपांबाबत आपण त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. नॅशनल कॉन्फरन्सने मुख्यमंत्री अब्दुल्ला यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी आज शाह यांच्या मृत्यू प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. युसुफ शाह हे मोठय़ा प्रमाणात राजकीय भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतले होते. गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काही नेते आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह त्यांची काही मुद्दय़ांवरून बाचाबाची झाली होती. पक्षाच्या दोघा नेत्यांकडून एक कोटी रुपये घेऊन त्यांना मंत्रिमंडळात तसेच विधान परिषदेमध्ये स्थान देण्याचे आश्वासन शाह यांनी दिले होते. यावरूनच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शाह यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तथापि, दुसऱ्या दिवशी कोठडीत त्यांचा मृत्यू झाला.

 

Tags: