अण्णा समर्थकांनीच जाळला अण्णांचा पुतळा

जंतर मंतरवरचं उपोषण थांबवून आता टीम अण्णांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देशभरातील सामान्य नागरिकांचा जरी पाठिंबा असला, तरी त्यांच्यावर टीकाही तेवढीच होत आहे.

Updated: Aug 4, 2012, 03:04 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जंतर मंतरवरचं उपोषण थांबवून आता टीम अण्णांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाला देशभरातील सामान्य नागरिकांचा जरी पाठिंबा असला, तरी त्यांच्यावर टीकाही तेवढीच होत आहे.

 

काही राजकीय पक्षांनी अण्णांची खिल्ली उडवली आहे, तर काही पक्षांनी अण्णांना ऑफरही दिली आहे. मात्र अण्णा हजारेंनी आंदोलन सोडून राजकारणात जाऊ नये यासाठी बऱ्याच जणांनी विरोध दर्शवला आहे. त्यांचा निषेद केला आहे. अण्णा हजारेंच्या राणेगणसिद्धीतही अण्णांनी राजकारणात येण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अण्णा यांचे स्वीय सहाय्यक व जवळचे सहकारी सुरेश पठारे यांनीही अण्णांनी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे, असे म्हटले आहे. गुजरातमधील त्यांच्या समर्थकांनीच अण्णांचा प्रतिमात्मक पुतळा जाळला आहे.

 

भ्रष्टाचार आणि लोकपालच्या मुद्यावर सरकार दखल घेत नसल्यानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी काल जंतरमंतरवरुन राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं येणा-या निवडणुकांमध्ये अण्णाही इतर नेत्यांप्रमाणं प्रचारसभा गाजवताना दिसतील. त्यांच्या या निर्णयामुळं टीम अण्णाची ही नव्यानं सुरुवात ठरणार की शेवट. याचा निर्णयही येणा-या काही दिवसांत दिसणाराय.