www.24taas.com, नवी दिल्ली
15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत. लोकपालवरुन सरकार सातत्यानं फसवणूक करत असल्याचा अण्णांनी केलाय. तर प्रणवदा राष्ट्रपती होणं हे दुर्भाग्यपूर्म असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
गेले दीड वर्षांपासून लोकपालसाठी आम्ही लढा देत आहोत, स्थायी समिती आणि संसदेत सरकारने जनतेला धोकाच दिला. लोकपाल बिलासंदर्भात सरकार शब्द पाळत नाही. लोकपालमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल मात्र सरकार याबाबतीत धोका देत आहे. टीम अण्णामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आमच्या बदनामीची बनावट सीडी बनवली गेली असं म्हणत अण्णांनी सीडीच्या मुद्यावर आपलं उत्तर दिलं आहे. एवढंच नाही, तर हिंमत असेल, तर आमच्यावर खटले दाखल करा, असं सरकारला आव्हान दिलं आहे. ४ दिवस वाट पाहाणार, त्यानंतर उपोषण करणार असल्याचं सांगून अण्णांनी सरकारला ४ दिवसांचं अल्टिमेटम दिलं आहे. यानुसार २९ जुलैपसून उपोषण करणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं. टीम अण्णामधील सदस्य अरविंद केजरीवालांनी पुन्हा प्रणवदांवर टीकास्त्र सोडलं आहे. प्रणवदा भ्रष्टाचारी असून असे भ्रष्टाचारी राष्ट्रपती मिळणं हे देशाचं दुर्भाग्य आहे. मुलायम यांच्या भूमिकेवरही केजरीवाल यांनी आक्षेप घेतला.
आधी अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे उपोषण करणार होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा आज दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतल्यानं दिल्लीतलं वातावरण आता तापू लागलंय. संसदेतील 14 भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हे आंदोलन असून त्या भ्रष्ट मंत्र्यांची यादी याआधीच त्यांनी सोपवली आहे. सरकारनं आतापर्यंत 3 वेळा फसवलंय आता शेवटपर्यंत लढणार असा एल्गारही अण्णांनी केलाय.