झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रिपद देण्यात आल आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढं ठेऊन अजित सिंह यांना स्थान देण्यात आलं आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अजित सिंह यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
पश्चिम उत्तर प्रदेशात अजित सिंह यांची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यांच्या राष्ट्रीय लोकदलाबरोबर आघाडी करुन बसपाला टक्कर देण्याची काँग्रेसची रणनिती आहे. अर्थात अजित सिंह यांनी गेल्या दहा ते अकरा वर्षांत कधी भाजप तर कधी समाजवादी पक्ष नंतर पुन्हा भाजपशी घरोबा केला होता. आता ते काँग्रेसशी आघाडी करत आहेत.
अजित सिंह यांना मंत्रिपद देऊन काँग्रेस आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे हे मात्र निश्चित. यूपी विधानसभेत राष्ट्रीय लोकदलाचे १० आमदार आहेत, तर लोकसभेत ५ खासदार आहेत. त्यामुळे अजित सिंहांना बरोबर घेऊन जाण्याचा निश्चय फायद्याचा ठरेल असं काँग्रेसला वाटत आहे.