www.24taas.com, मुंबई
शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप|… असाच शिवरायांचा प्रताप आता बिग स्क्रीनवर अनुभवता येणार आहे. कारण ‘राजा शिवछत्रपती’ मालिका आता सिनेमारुपात आपल्या भेटीला येणार आहे.
नितीन देसाईंची निर्मिती असलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका आता चित्रपट रुपानं पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. दोनशेपेक्षा अधिक भागांची ही मालिका आता चक्क दोन तास १० मिनिटांच्या सिनेमाच्या रुपात येत आहे. शिवरायांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत महाराजांच्या आयुष्यातले आठ महत्वाचे टप्पे या सिनेमात दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अमोल कोल्हेनं साकारलेला शिवाजी, मृणाल कुलकर्णीने साकारलेली जिजाऊ आणि अविनाश नारकर यांनी साकारलेले शाहीजी राजे आपल्याला सिनेमात पहायला मिळणार आहेत. मालिकेचं सिनेमात रुपांतर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
आजवर शिवाजी महाराजांवर अनेक मराठी चित्रपट झाले. मात्र आजवरच्या सिनेमांमध्ये हा सिनेमा भव्य दिव्य असेल. तेव्हा शिवराय़ांचे रुप आणि प्रताप बिग स्क्रीनवर पुन्हा पाहण्यासाठी तमाम मराठी प्रेक्षक उत्सुक असतील, एवढं नक्की