www.24taas.com, मुंबई
मराठी सिनेरसिकांसाठी खूशखबर आहे. 'श्यामची आई' पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नव्या श्यामची आईमध्ये आईची भूमिका साकारणार आहे माधुरी दीक्षित.
श्यामची आई ही पू. साने गुरूजींनी लिहीलेली मराठीमधील अजरामर कादंबरी. आपल्या बालपणीच्या आठवणी, संस्कार, संस्कृती, शिस्त यांचं यथार्थ वर्णन करणारं शब्दचित्रं. बालसाहित्यातील महत्त्वाचा ठेवा.याच कादंबरीवर आचार्य प्र. के. अत्रे यांनी १९५३ रोजी 'श्यामची आई' चित्राकृती दिग्दर्शित केली. हा सिनेमाही अत्यंत प्रभावशाली होता. त्याला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णकमळही मिळालं होतं. या सिनेमात श्यामच्या सोज्वळ आईची भूमिका वनमालाबाईंनी केली होती.
याच कलाकृतीवर आता पुन्हा चित्रपट निर्माण होत आहे. महेश मांजरेकर यांनी श्यामची आईवर सिनेमा काढण्याचा निश्चय केला आहे. यामध्ये श्यामच्या आईच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला विचारण्यात आलं आहे. ही भूमिका आपल्यालाही प्रभावित करणारी असल्याचं माधुरी दीक्षितने सांगितलं. श्यामची आई म्हणजे महाराष्ट्रातील पिढ्यांना संस्कारीत करणारा स्त्रोतच मानला जातो. महेश मांजरेकर यांना याविषयी विचरलं असता ते म्हणाले, “श्यामची आई म्हणजे मराठी साहित्यातील एक रत्नच आहे. या कादंबरीवर सिनेमा बनवण्याची माझी फार पूर्वीपासून इच्छा होती. या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर माधुरीच असल्यामुळे मी तिला विचारले आहे.”
माधुरीने श्यामची आई सिनेमातून जर मराठीत पदार्पण केलं, तर तो रसिकांसाठी दुग्धशर्करा योगच ठरेल, हे नक्की!