मराठी चित्रपटसृष्टीचं कसं होणार?

कोल्हापूरची चित्रनगरी सरकार करणार की बीओटी तत्वावर होणार, याबाबतचा निर्णय अजूनही होत नाहीये. चित्रपट महामंडळ आणि निर्माते चित्रनगरीचा विकास सरकारने करावा असं म्हणतायेत.

Updated: Jun 27, 2012, 11:28 PM IST

www.24taas.com, दीपक शिंदे, कोल्हापूर

 

कोल्हापूरची चित्रनगरी सरकार करणार की बीओटी तत्वावर होणार, याबाबतचा निर्णय अजूनही होत नाहीये. चित्रपट महामंडळ आणि निर्माते चित्रनगरीचा विकास सरकारने करावा असं म्हणतायेत. तर शासकीय पातळीवर निविदा काढून जो पर्याय चांगला असेल त्याचा विचार होईल असं म्हटलं जातंय. त्यामुळे चित्रपटनगरी पुन्हा बीओटी की सरकारी असा वाद सुरू झालाय.

 

कलानगरी म्हणून ओळख जपलेल्या कोल्हापुरात शालिनी, जयप्रभा आणि चित्रनगरी अशी चित्रपट निर्मितीची तीन मुख्य केंद्र होती. पैकी शालिनी स्टुडिओ इतिहासजमा झाला. जयप्रभाही खासगी असल्याने चित्रीकरणाला मर्यादा पडताहेत. तर चित्रनगरीचं रुप पालटावं, अशी कोल्हापूरकरांची मनोमन इच्छा आहे. चित्रनगरीचा विकास करण्याचा निर्णय तर झालाय. मात्र, आता घोडं अडलंय, ते हा विकास सरकार स्वतः करणार की बीओटीवर करायचा यावर...

 

सध्या चित्रनगरी पूर्णपणे मोडकळीस आलीये. त्याचा विकास हा बीओटीवर करून पुन्हा खासगीकरण नको अशी भूमिका चित्रपट महामंडळ आणि निर्मात्यांनी घेतलीय. चित्रनगरीच्या विकासाबाबत मिटकॉन कंपनीतर्फे एक आराखडा तयार करण्यात येतोय. मिटकॉनच्या अहवालानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे. सरकारी खर्चानेच चित्रपटनगरीचा विकास व्हावा, यासाठी चित्रपट महामंडळ आग्रही आहे. याबाबत सरकार आता काय भूमिका घेणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.