पायल रोहतगीचं स्टिंग ऑपरेशन

बॉलीवूडमध्ये काळा पैसा लावून सिनेमा निर्मिती करायची पद्धत नवी नाही. पूर्वीपासून अनेक लोक आपला काळा पैसा सिनेक्षेत्रात घालून आपलं उखळ पांढरं करून घेत असतात. अण्णा हजारेंना दाखवण्यात आलेल्या 'गली गली में चोर है' या सिनेमाची निर्मितीही काळ्या पैशातून झाली होती.

Updated: Jul 12, 2012, 03:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बॉलीवूडमध्ये काळा पैसा लावून सिनेमा निर्मिती करायची पद्धत नवी नाही. पूर्वीपासून अनेक लोक आपला काळा पैसा सिनेक्षेत्रात घालून आपलं उखळ पांढरं करून घेत असतात.  यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने अनेक चित्रपटांत त्याचा पैसा गुंतवला होता असे सांगितले जाते. अण्णा हजारेंना दाखवण्यात आलेल्या 'गली गलीमें चोर है' या सिनेमाची निर्मितीही काळ्या पैशातून झाली होती.  नुकत्याच एका न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बॉलीवूडमधील ही बाब उघड झाली आहे.

काही वर्षांपूर्वी सलमान खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटासंदर्भात ब्लॅक मनीमुळे मोठे वादंग माजले होते. नुकत्याच झालेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बॉलीवूडच्या अनेक दिग्गज निर्मात्यांनी या ब्लॅकमनी वापराचे फंडे सांगितले. अनेक बड्या निर्मात्यांचा यात समावेश आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते वासू भगनानी, अनीस बज्मी, अनुभव सिन्हा, मॉडेल पायल रोहतगी, संग्राम सिंह आणि आरती छाब्रिया यांनी स्टिंग ऑपरेशनदरम्यान बॉलीवूडधील काळ्या पैशाबाबत कबुली दिली आहे.

 

दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले की, बॉलीवूडमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करणे अतिशय सोपे आहे. केवळ एकच काम करायचे, बिग बजेट चित्रपट करायचा. मग तो फ्लॉप झाला तरी चालेल. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘रा.वन’ हा चित्रपट याचेउदाहरण आहे. बॉलीवूडमध्ये अनेक लोक ब्लॅकचा पैसा व्हाइट करण्यासाठी उत्सक आहेत.वासू भगनानी यांनी बॉलीवूडला आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ते म्हणतात, माझ्याजवळ ब्लॅक मनी व्हाइट करण्याचे अनेक फंडे आहेत. या व्यवहारात ‘कॅश’ व ‘चेक’चे गणितही भगनानी यांनी सांगितले. अनीस बज्मी यांनीदेखील बॉलीवूडध्ये ब्लॅक मनी असल्याचे कबूल केले.

 

दरम्यान, बॉलीवूडमधील ब्लॅक मनीबाबत केंद्रीय मंत्री वीरप्पा मोइली आणि अंबिका सोनी यांनी चिंता व्यक्त केली आहे. कलाकारांना देण्यात येणारे मानधनदेखील ब्लॅक पद्धतीने घेण्यात येते.  मॉडेल पायल रोहतगी आणि तिचा सध्याचा प्रियकर संग्राम सिंह एक चित्रपट करत आहेत. त्यांनी त्यांचे मानधन प्रत्येकी 30 लाख रुपये एवढे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात कागदोपत्री हे कलाकार 5 लाख रुपयांच्या रकमेवर सही करतात. म्हणजेच सुमारे 25 लाख रुपये हे बेहिशेबी असतील. अशा प्रकारे बॉलिवूडमध्ये काळ्या पैशाचा मुद्दा सध्या गाजत आहे