मराठी नटरंग आता हिंदीत

गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे रवी जाधव दिग्दर्शित नटरंग. रवी जाधव यांनी नटरंग सिनेमा हिंदीत तयार करायचं ठरवलंय.

Updated: Dec 15, 2011, 08:08 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

हिंदी सिनेमाचे रिमेक तयार होणं हे बॉलिवूडमध्ये नित्यनियमाचचं आहे.  मात्र आता मराठीत गाजलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक लवकरच आपल्या भेटीला येतोय. आणि हा गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे रवी जाधव दिग्दर्शित नटरंग. रवी जाधव यांनी नटरंग सिनेमा हिंदीत तयार करायचं ठरवलंय.

 

चाकोरीबाहेर विचार करणा-या एका सृजनशील माणसाच्या संघर्ष कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे नटरंग... तमाशाची पार्श्वभूमी असलेला नटरंग सिनेमा २०१०च्या सुरुवातीला थिएटरमध्ये दाखल झाला आणि या सिनेमाने पहाता पहाता मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे रेकॉर्ड मोडत काढले. गुणा कागलकर आणि नैना कोल्हापूरकरीण यांची हळूवार प्रेमकहाणी, तमाशाच्या प्रेमापोटी नाच्या व्हायला तयार झालेल्या गुणा कागलकरचा संघर्ष हे सगळ काही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं. अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये या सिनेमाने आपली मोहर उमटवली.

 

दिग्दर्शक रवी जाधवांच्या या पहिल्याच कलाकृतीला सर्व स्तरातून दाद मिळाली.  महाराष्ट्रभरात गाजलेला हा सिनेमा आता राष्ट्रीय स्तरावर पोहचावा या उद्देशाने दिग्दर्शक रवी जाधवांनी एक निर्णय घेतलाय. आणि हा निर्णय म्हणजे आता रवी जाधव हिंदीतही नटरंग सिनेमा घेऊन येतायत.

 

या सिनेमात अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी गुणा कागलकरच्या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली मेहनत सगळ्यांनाच अवाक् करणारी होती. या भूमिकेसाठी अतूलने जेवढं वजन वाढवलं तेवढच ते कमीही केलं. आता या हिंदी प्रोजेक्टमध्ये अतूलच गुणा कागलकरची भूमिका साकारणार की त्याच्या ऐवजी दुस-या कोणत्या कलाकारची वर्णी लागणार याचीही उत्सुकता होती. मात्र ती उत्सुकता रवी जाधवांनी दूर केलीय.

 

अजय अतुलचं संगीत, अतूल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, विभावरी देशपांडे, किशोर कदम यांच्या कसदार अभिनयाने नटरंगला एका वेगळ्या उंचीवर नेलं. आता हिंदीत साकार होत असलेला नटरंगही प्रेक्षकांच्या मनात आपली मोहर उमटवतो का हेच पाहायचंय