www.24taas.com, नाशिक
दादासाहेब फाळके यांनी अखेरच्या टप्प्यात लिहिलेलं रंगभूमी हे नाटक आजही अंधारात आहे. या नाटकाची लांबी आणि सध्याच्या प्रेक्षकांची मानसिकता पाहता त्यावर सिनेमा-नाटक अशक्य आहे. मात्र या संहितेवर आधारीत मालिका बनवण्यासाठी हा अमूल्य ठेवा हवाली करण्यास फाळके कुटुंबीय तयार आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक अर्थात दादासाहेब फाळके...हलत्या चित्रांच्या ध्यासानं पछाडलेल्या दादासाहेबांनी 'राजा हरीश्चंद्र' हा पहिला मूकपट निर्माण करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली.. त्याच दादासाहेबांची ही हस्तलिखितं...अल्झायमर या आजारानं अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेतही कलेबाबतचं त्यांच प्रेम अद्भुत होतं याची साक्ष देणारी... रंगभूमी या सात अंकी नाटकाची ही संहिता...मात्र हे नाटक आजही अंधारात आहे. सुरुवातीचे दोन चार प्रयोग वगळता अनेक अंक प्रकाशझोतात आलेले नाहीत. दादासाहेबांच्या नातीकडे ही हस्तलिखित उपलब्ध आहेत.
अनुराग, संगीत अशी विविध पात्रं या नाटकात आहेत. शिवाय रंगभूमीवरील विविध क्षणांचा उल्लेख यांत आहे. नाटकांत काम करणं, त्याची निर्मिती करताना येणा-या समस्या आणि यावेळी घडणा-या प्रक्रियांमधल्या मनोरंजक घटनांचा मेळ यांत आहे. ही संहिता मोठी असल्याने नाटक किंवा चित्रपट म्हणून सादर होणं अवघड आहे. मात्र मालिका करण्यास कोणी तयार असल्यास त्यासाठी ही संहिता देण्यास फाळके कुटुंबिय तयार आहेत. चित्रपटसृष्टीच्या शतकी वर्षात दादासाहेब फाळकेंच्या कार्याचा गौरव करणारे अनेक कार्यक्रम सादर होतात. मात्र आज खरी गरज आहे ती रंगभूमी साऱख्या अनेक कलाकृतीना पुन्हा उजाळा देण्याची.