अन् चहावाल्या 'बाळू'चाही सत्कार....

रंगभूमीवरच्या कलाकारांना नेहमीच मोठी मदत होते ती बॅक स्टेज आर्टिस्टची आणि नाटकात शेवटच्या अंकापर्यंत एनर्जी टीकून रहावी आणि कलाकार ताजातवाना राहावा हे पाहणा-या चहावाल्याची.

Updated: Jun 26, 2012, 11:05 PM IST

www.24taas.com, मुग्धा देशमुख , मुंबई

 

रंगभूमीवरच्या कलाकारांना नेहमीच मोठी मदत होते ती बॅक स्टेज आर्टिस्टची आणि नाटकात शेवटच्या अंकापर्यंत एनर्जी टीकून रहावी आणि कलाकार ताजातवाना राहावा हे पाहणा-या चहावाल्याची... अशाच एका चहावाल्या बाळूचा सत्कार शिवाजी मंदिरात नुकताच पार पडला. त्यानं केलेल्या अविरत सेवेसाठी हा सत्कार करण्यात आला.. आणि या सत्काराला मराठी रंगभूमीवरचे दिग्गज कलाकार आवर्जून हजर होते.

 

शिवाजी मंदिरमध्ये सकाळ पासून मध्यरात्री पर्यंत कलाकारांना येणारी चहाची तल्लफ भागवणारा चहावाला म्हणजे बाळू चहावाला. कोणत्या कलाकाराला कसा चहा लागतो हे  बाळूला नं सांगता कळलंय. आणि गेली कित्येक वर्ष प्रत्येक कलाकाराची चहाची आवड निवड बाळू नं बोलता जपतो. 30 ते 32  वर्ष बाळू कलाकारांना चहा द्यायची सेवा अविरत करतोय. त्याच्या या नि:स्वार्थी कार्याची पावती म्हणून आणि मुलीच्या लग्नासाठी त्याला मदत म्हणून मराठी व्यापारी पेठेचे अध्यक्ष अनंत भालेकर यांनी त्याला तब्बल एक लाख रुपयांची मदत देऊ केली तीही या छोट्याशा सत्कार सोहळ्यात.

 

विशेष म्हणजे बाळूचा सत्कार होणार हे ऐकल्यावर बाळूचा चहा प्यायलेला प्रत्येक कलाकार जातीनं त्याचं कौतुक करायला हजर होता. फक्त चहावालाच नाही तर बाळू नाटकाचा पहिला प्रेक्षक असतो त्यामुळे नाटकाला मिळणारी त्याची पावतीही प्रत्येक कलाकाराला महत्वाची वाटते. तर कलाकारांनी दाखवलेल्या प्रेमापोटी बाळूही भारावून गेला.. आणि शेवटच्या श्वासापर्यंत कलाकारांच्या सेवेत कटीबद्ध राहीन असं बोलूनंही गेला. बाळूच्या नि:स्वार्थी सेवेबाबत मराठी कलाकार आणि व्यापा-यांनी दाखवेलल्या आपुलकीनं माणुसकीचं नातंच अधोरिखित झालं..