मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या अनिल अंबानी यांच्या प्रतिष्ठेला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तब्बल २,८९२ कोटींच्या कर्जाची परतफेड न करू शकल्यामुळे येस बँकेने अनिल अंबानी समूहाचे मुंबईतील मुख्यालय ताब्यात घेतले आहे. याशिवाय, येस बँकेने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील दोन सदनिकाही ताब्यात घेतल्या आहेत. येस बँकेने बुधवारी वृत्तपत्रांमध्ये नोटीस प्रसिद्ध करून यासंदर्भातील माहिती जाहीर केली.
मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातील रिलायन्स सेंटर ही वास्तू अनिल अंबानी समूहाच्यादृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा विषय होता. Anil Dhirubhai Ambani Group (ADAG) समूहातील बहुतांश कंपन्यांचा कारभार याच मुख्यालयातून चालत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अनिल अंबानी समूहातील अनेक कंपन्या डबघाईला आल्या असून त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे.
येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला २,८९२.४४ कोटींच्या कर्जाच्या परतफेडीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, यानंतरही ६० दिवसांच्या कालावधीत अनिल अंबानी समूहाकडून कोणतीही हालचाल झाली नव्हती. त्यामुळे २२ जुलैला येस बँकेने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीच्या तीन मालमत्ता जप्त केल्या. भविष्यात या मालमत्तांसंदर्भाती कोणत्याही व्यवहाराचे हक्क येस बँकेकडे असतील, याची माहिती देण्यासाठी बुधवारी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली.
गेल्यावर्षीच ADAG समूहाकडून हे मुख्यालय लीझवर देण्याच्या विचार केला जात होता. जेणेकरून बँकेची थकबाकी अदा करता येईल. रिलायन्स सेंटरचे एकूण क्षेत्रफळ २१,४३२ स्क्वेअर मीटर इतके होते. तर दक्षिण मुंबईतील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीच्या इतर दोन सदनिकांचे (फ्लॅट) क्षेत्रफळ अनुक्रमे १,७१७ चौरस फूट आणि ४,९३६ चौरस फूट इतके होते. बुडीत कर्जाच्या समस्येमुळे मध्यंतरी येस बँक डबघाईला आली होती. येस बँकेच्या बुडीत कर्जांमध्ये अनिल अंबानी समूहाला दिलेल्या कर्जांचे प्रमाण मोठे आहे.
दरम्यान, २३ जूनला अनिल अंबानी यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर सध्या सहा हजार कोटीच्या कर्जाचा बोजा आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात हे कर्ज फेडले जाईल, असे अनिल अंबानी यांनी सांगितले होते. २०१८ साली ADAG समूहाने मुंबईतील वीज कंपनी अदानी ट्रान्समिशनला १८८०० कोटी रुपयांना विकली होती. त्यामुळे अनिल अंबानी समूहाच्या डोक्यावरील ७५०० कोटींचे कर्ज फिटले होते.