लठ्ठ मुंबईकर! 46 टक्के मुंबईकरांचं वजन सरासरीपेक्षा अधिक, वाचा मुंबई पालिकेचा अहवाल काय सांगतो

Mumbai : मुंबईकरांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. तब्बल 46 टक्के मुंबईकरांचे वजन सरासरीपेक्षा अधिक असून महिलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय. जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं स्टेप्स संयुक्त सर्वेक्षण 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Nov 13, 2023, 08:24 PM IST
लठ्ठ मुंबईकर! 46 टक्के मुंबईकरांचं वजन सरासरीपेक्षा अधिक, वाचा मुंबई पालिकेचा अहवाल काय सांगतो title=
संग्रहित फोटो

World Diabetes Day​  :  जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये वर्ष 2021 मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, 18 ते 69 वर्ष या वयोगटातील सुमारे 18% व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण 126 मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेलं आढळलं आहे.  प्री-डायबेटिस- (Impaired fasting glycemia) ची टक्केवारी 15.6% आहे. (रक्तातील साखरेचे प्रमाण ≥110 mg/dl आणि < 126 mg/dl)अशा व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाही, तर अशा व्यक्तींना पुढे जाऊन मधुमेह होऊ शकतो. 8.3% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळलेत. लठ्ठ आणि बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका अधिक असतो.  सामान्यतः 35 वर्षे किंवा त्याहून अधिक व्यक्तींना याचा धोका जास्त आहे.

महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक  इकबाल सिंह चहल तसंच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक आरोग्य चाचणी करून उपचार  घेण्यासाठी मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने / हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथं संपर्क साधावा, असे आवाहन केलं आहे. तसंच नागरिकांनी जीवनशैली विषयक योग्य बदल स्वीकारणं गरजेचं असून त्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून विविध सेवेचा लाभ घ्यावा, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 

मुंबईतील नागरिकांमध्ये लठ्ठपणा 
मुंबईतील स्टेप्स सर्वेक्षणानुसार सुमारे 46% नागरिकांचं वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे (WHO वर्गीकरणानुसार BMI 25 kg/M2 किंवा त्या पेक्षा जास्त). 12% मुंबईकर लठ्ठ (WHO वर्गीकरणानुसार BMI 30 kg/M2 किंवा त्या पेक्षा जास्त )असल्याचं आढळलं आहे. यातही लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला.

घोषवाक्याचा खरा अर्थ साकार करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये मधुमेह संदर्भातील प्राथमिक चाचणी आणि निदान करण्याच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका दवाखाना आणि आपला दवाखाना इथं प्रत्येक महिन्यात 60 ते 70 हजार नागरिकांची मधुमेह आणि रक्तदाब तपासणी करण्यात येते आणि सुमारे 50 हजार रुग्ण नियमितपणे  मधुमेहासंदर्भातील उपचार घेत आहेत. 30 वर्षे पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अधिकाधिक सक्षमरीत्या चाचणी करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या 26 रुग्णालयांमध्ये ऑगस्ट 2022 पासून मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी केंद्र (NCD Corners) सुरु केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ऑगस्ट 2022 पासून आतापर्यंत 2 लाख 54 हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी 12% व्यक्तिमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण (random sugar) 140 मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक आहे. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

सर्व विभागात आरोग्य चाचणी सर्वेक्षण
जानेवारी 2023 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका / आशा सेविका यांच्या मार्फत लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने 30 वर्षे वयावरील व्यक्तींची उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत अंदाजे 13  लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे त्यातील 12 हजार व्यक्तीना उच्चरक्तदाब असल्याचं आढळून आलं आहे.

तसंच मधुमेह असलेल्या रुग्णांना आहार विषयक सल्ला देण्याची/ समुपदेशन सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.आतापर्यंत 32 हजार रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैली बदल व मधुमेह संदर्भातील समुपदेशन करण्यात आलं आहे. तसंच प्रत्येक विभागात मनपा द्वारे चालू करण्यात आलेले योगा केंद्राचा लाभ नागरिकांनी घ्यावं असा आवाहन करण्यात आलं आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम:-
येत्या 14 नोव्हेंबर 2023 जागतिक मधुमेह दिना निमित्ताने मुंबईतील उद्यानामध्ये मोबाईल व्हॅन, रेल्वे स्थानक, सामान्य सुविधा केंद्र (CFC wards ), मॉल्स मध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर, रेडिओ जिंगल द्वारे सामाजिक माध्यमातून नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.