अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : कधी प्रवाशांसोबत मुजोरी तर कधी भाडेवाढीची मागणी. रिक्षावाला (Auto Rikshaw) नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता याच रिक्षावाल्यांची तक्रार घेऊन महिला थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत (CM Eknath Shinde) पोहचल्यायेत. या महिलांचा आक्षेप आहे तो रिक्षातल्या आरशावर (Mirror). बहुतेक पुरूष रिक्षाचालक ड्रायव्हरसमोर लावलेल्या रिअर व्ह्यू मिररचा (rear view mirror) वापर प्रवासी महिलेकडे एकटक बघण्यासाठी करतात असा या महिलांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि अपघात होतात.
रिक्षातील असे आरसे काढून टाकावेत अशी मागणी महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेनं केलीय. रिक्षाच्या आत जो आरसा बसवण्यात आला आहे. त्याचा काही उपयोग नसतो. कारण रिक्षा पाठिमागून संपूर्ण बंद असते. या आरशाचा उपयोग फक्त पाठिमागे बसलेल्या महिलांना किंवा मुलींना बघण्यासाठी केला जातो, असा आरोप या स्वंयसेवी संस्थेने केला आहे.
तसं पाहिलं तर इतर वाहनांप्रमाणे ऑटो रिक्षाला रिअर व्ह्यु मिररची आवश्यकता नसते. रिक्षाला दोन साईड व्ह्यू मिरर (Side View Mirror) दिलेले असतात. त्यांचा वापर करून ते सहजपणे रिक्षा चालवू शकतात. असं असताना ड्रायव्हर सीटवर आरशाची गरजच काय? असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आता महिलावर्गाच्या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हेच पाहायचंय.