प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : एटीएममधून पैसे लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीम मशीनला स्कीमर मशीन बसवून त्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील पैसे लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले आहे.
सौरभ यादव, धनराज पासवान , पवनकुमार पासवान आणि राकेश चौधरी अशी आरोपींची नावं आहेत. हे आरोपी हॉटेल्समधील वेटर, पेट्रोल पंपावरील कामगारांना यांना हाताशी धरून ग्राहकांच्या एटीएमच्या पीनकोड चोरी करत असत. त्यानंतर लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरचा वापर करून संबंधीत कार्ड धारकाच्या बँक खात्यातील पैस्यांची चोरी करायचे. तसंच एटीएमला स्किमर मशीन लावूनही ही टोळी पीनकोड मिळत होती.
या टोळीतील विरार इथं राहणारा सौरभ यादव हा आरोपी वसईत स्कीमर मशीन घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे त्याला ताब्यात घेत चौकशी करून पोलिसांनी या गुन्ह्यातील त्याच्या इतर साथीदारांना अटक केली आहे.
स्किमर मशीन कशी काम करते?
प्रत्येक एटीएम कार्डच्या मागील बाजूला एक मॅग्नेटीक पट्टी असते, या पट्टीमध्ये तुमच्याबद्दलची बरीच माहिती आणि तुमचा पिन या गोष्टी साठवलेल्या असतात.
एटीएम स्कीमर हे एक असे मशिन असते जे एटीएम स्लॅाटवर बसवले जाते. या मशिनद्वारे स्लॅाटमध्ये सरकवल्या जाणाऱ्या प्रत्येक एटीएम कार्डवरील मॅग्नेटीक स्वरूपातील माहिती वाचली जाते, कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिने तुमची मॅग्नेटिक पट्टीवरील माहिती मिळवणे म्हणजे तुमच्या बॅंक खात्याचा एक्सेस मिळवण्यासारखेच आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सावधगिरी जरुन बाळगा.