मुंबई : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे या राजकारणाचा कसा सामना करतात. उद्धव ठाकरेंसमोर संभाव्य आव्हाने काय असतील यावर 'झी २४ तास'चा हा स्पेशल रिपोर्ट. उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने पहिले ठाकरे मुख्यमंत्री होतील. आणि एकाचवेळी वडील मुख्यमंत्री आणि मुलगा आमदार असंही महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडेल.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. राज्याचा गाडा मंत्रालयाच्या ज्या सहाव्या मजल्यावरुन चालतो त्या मजल्यावरुन उद्धव ठाकरे राज्यशकट चालवणार आहेत. ५६ जागांच्या जोरावर मुख्यमंत्रिपद मिळवणं हे शिवसेनेसाठी मोठं यश असलं तरी मुख्य़मंत्रिपद काटेरी मुकूटापेक्षा कमी नाही. उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्रिपद संधी असली तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असणार आहे.
पहिली गोष्ट म्हणजे सत्तेचं कोणतंही घटनात्मक पद भूषवल्याचा अनुभव नसताना उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर थेट महाराष्ट्राचा गाडा हाकण्याची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरेंसमोर प्रशासन गतीमान ठेवण्याचं मोठे आव्हान आहे. उद्धव जरी मुख्यमंत्री असले तरी ते तीन भिन्न विचारधारेच्या पक्षांचे मंत्री असलेल्या सरकारचे नेतृत्व करणे उद्धव ठाकरेंसाठी कसरतीचं काम असणार आहे. शिवाय अशा सरकारचा नेतृत्व करताना निर्णय घेण्यावर मर्यादा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
उद्धव ठाकरेंनी सगळं जुळवून जरी आणलं तरी मित्रपक्षांच्य़ा नेत्यांचे रुसवेफुगवे काढण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर येणार आहे. सरकार जर कामकाजात अपयशी ठरलं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्याची भीतीही शिवसेनेला असणार आहे. सत्तापद स्वीकारल्यानंतर ठाकरे घराणं म्हणून जो करिष्मा आहे तो करिष्मा गमावण्याचा धोका आहे. धाडसी निर्णय घेतले नाहीत तर राजकारणात कोणीही गोष्ट यशस्वी होत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचं शिवधनुष्य उचले आहे. मुख्यमंत्रिपदाचं शिवधनुष्य येत्या काळात ते कसं पेलतात हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
ज्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं अट्टहास केला ते मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंना मिळालंय. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी राजकीय संधी असणार आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरलाय. अब की बार उद्धव सरकार. ज्यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ आला आहे. मात्र, आव्हने कमी नाहीत. सत्तेत असणारा भाजप आज विरोधी बाकावर असणार आहे. त्यामुळे सत्तेचा अनुभव नसणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांचा सामना करावा लागणार आहे.
उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावं लागणार आहे. त्या निमित्तानं दुसरा ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरेल. आतापर्यंत शिवसेनेचं नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात वेगवेगळ्या कल्पक योजना राबवण्यासाठीही त्यांना वाव मिळणार आहे. मुख्यमंत्रीपदच हातात असल्यानं दुसऱ्या कुणाचा अंकुश राहणार नाही. याच निमित्तानं राज्यात ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे तिथं शिवसेना मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.
शिवसेनेच्या विस्तारासाठी यासारखी सुवर्णसंधी शिवसेनेला दुसरी कोणतीही नाही. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानं राज्याचा प्रशासकीय गाडा हाकण्यास मिळेल. प्रशासन चालवण्याचा हा अनुभव उद्धव ठाकरेंना नवी राजकीय उंची मिळवून देईल, असं राजकीय अभ्यासक सांगतात. राजकीय संधी वारंवार चालून येत नाही. आलेली संधी कॅश करून उद्धव ठाकरे राजकीय दूरदृष्टीपणा दाखवला आहे.