पुन्हा पुन्हा लस घ्यावीच लागणार, काही महिन्यांत लसीचा प्रभाव कमी?

व्हायरस म्युटेट होत असेल, तर लसीचा परिणाम कमी होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

Updated: Jul 27, 2021, 07:32 PM IST
पुन्हा पुन्हा लस घ्यावीच लागणार, काही महिन्यांत लसीचा प्रभाव कमी? title=

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय आहे. यादृष्टीने देशात लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. पण लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आपल्या भोवती जणू एक अदृष्य चिलखत निर्माण होईल आणि आपल्याला कोरोना होणार नाही, अशा काही संभ्रमात असाल, तर थोडं थांबा. कारण लसीचे दोन डोस घेतल्यावरदेखील व्हायरसपासून संपूर्ण इम्युनिटी मिळेल, याची शाश्वती नाही. विशेषतः व्हायरस म्युटेट होत असेल, तर लसीचा परिणाम कमी होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इंग्लंडमध्ये लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लंडन विद्यापीठाच्या अभ्यासात फायझर आणि अॅस्ट्राझेनेका लसींची परिणामकारकता 2 ते 3 महिन्यांनी कमी होत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता बुस्टर डोसचा परिणाम तपासण्यासाठी इंग्लंडमध्ये सर्वेक्षण सुरू झालंय. 

लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यावर इम्युनिटी वाढते, हे खरंच आहे. मात्र नैसर्गिकरित्या वाढलेल्या अँटीबॉडीज् नसल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होत असावा, असं शास्त्रज्ञांना वाटतंय. हे खरं ठरलं, तर आपल्याला पुढली काही वर्षे नियमित अंतरानं कोविड लसीचे बुस्टर डोस घ्यायची तयारी ठेवावी लागेल.