मुंबई : दोन दिवसापूर्वीच स्वपक्षीय आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पक्ष कार्यालयात भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे मंद म्हात्रे पुन्हा स्वगृही परतणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलले होते. गुप्त मतदानाद्वारे निवड न करता आवाजी मतदादाने हि निवड करण्याचा बदल करण्यात आला होता.
यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केली होती. गुप्त मतदान घेतल्यास अनेक नाराज आमदार विरोधात मतदान करतील अशी भीती सरकारला वाटत आहे असे ते म्हणाले होते.
हा वाद राज्यपालांच्या कोर्टात जाऊन त्यावर निर्णय झाला नाही. मात्र, सत्ताधारी पक्षाचे आमदार नाराज असल्याचे दिसत नसले तरी विरोधी पक्षाचे आमदार मात्र नाराज असल्याचे दिसत आहे.
चार दिवसांपूर्वीच माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर कौतुक केले होते. त्यातच आज आमदार मंदा म्हात्रे यांनीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
आमदार मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, त्यांचे आणि नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांच्या वितुष्ट अधिकच वाढले. दोन दिवसांपूर्वीच म्हात्रे यांनी नाईकांवर रुग्णालय उभारणीच्या कामावरुन आरॊप केला होता.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विकास कामांसाठी भेट घेतल्याचा दावा आमदार म्हात्रे यांनी केला आहे. यावेळी त्यांचा मुलगाही सोबत होता. भाजपा आमदार असूनही राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात जाऊन काम सांगणे हे कितपत योग्य आहे अशी चर्चा यानिमित्त सुरु आहे.