मुंबई: पंतप्रधान कार्यालयातील (PMO) काही अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेटाळून लावला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले. यावेळी रोहित पवार यांनी म्हटले की, पवार साहेब गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आहेत. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी देशासमोरील एखादी अडचण शरद पवारांकडे बोलून दाखवत असतील तर त्यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही.
पंतप्रधान कार्यालयातील सध्याची परिस्थिती पाहता तेथील अधिकारी काही बोलत असतील, असे वाटत नाही. मात्र, काही माजी अधिकारी मार्गदर्शनाच्यादृष्टीने काही गोष्टी सांगत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही. तसेच सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे PMO मधील हेरांविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी ती जाहीर करावी. मात्र, सुब्रमण्यम स्वामी यांना इतकेच गांभीर्याने घ्यायचे असेल तर त्यांनी भाजपवर केलेले आरोपही ग्राह्य धरले पाहिजेत, असे रोहित पवार यांनी सांगितले.
सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी ट्विट करून शरद पवार यांच्यावर हे आरोप केले होते. सध्याच्या घडीला पंतप्रधान कार्यालयात हिंदूविरोधी विचारसणीच्या अधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे. यापैकी काहीजण शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहेत. या अधिकाऱ्यांच्या गटाकडून पंतप्रधान कार्यालयातील देशभक्त अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) दिल्लीत ज्याप्रकारे आंदोलनाचे लोण पसरले त्यावरून आपण धडा घेतला पाहिजे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.