संजय सिंह/ राकेश त्रिवेदी, मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती पुढं आलीय. मोईन म्हणजे दाऊदच्या एकूलत्या मुलाबाबत इक्बाल कासकरनं मोठा गौप्यस्फोट केलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आपल्या कुटुंबाला डी कंपनीच्या गोरखधंद्यापासून दूर ठेवले आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत झालेत. पण इक्बालने दिलेल्या नव्या माहितीमुळे ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकालाही जबर धक्का बसलाय.
दाऊदचा एकूलता मुलगा मोईन याला दाऊदच्या गोरखधंद्यात अजिबात रस नाही. मात्र, मोईनचा ओढा धार्मिक बाबींकडं जास्त आहे. तो एवढा धार्मिक आहे की, तो आता 'हाफिज ए कुराण' बनलाय. म्हणजेच त्यानं कुराण अगदी तोंडपाठ केलंय. कराचीतल्या एका मशिदीत तो मौलाना बनलाय. आणि इस्लाम धर्माचे धडे इतरांना देतोय.
दरम्यान, यामागं दाऊद गँगचा एखादा मोठा कट असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. मौलाना झालेल्या मुलाचा वापर करण्याची दाऊदची काहीतरी गुप्त योजना असावी, असं सांगितलं जातंय.
धर्माच्या नावानं लोकांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करायचं. धर्माच्या आडून आपली काळी कमाई पांढरी करून घ्यायची. चॅरिटीच्या नावाखाली काळा पैसा इतर देशांना पोहोचवायचा आणि ड्रग्ज, सट्टा, शस्त्रास्त्र खरेदीसाठी हा पैसा वापरायचा, असा हा कट असू शकतो, अशी चर्चा आहे.
दाऊद आणि त्याच्या बायको मेहजबीन यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दाऊदची सर्वात मोठी मुलगी माहरूख हिचा निकाह पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादचा मुलगा जुनैद याच्याशी 2006 मध्ये झाला. दुसरी मुलगी माहरीनचा निकाह 2010 मध्ये अमेरिका निवासी पाकिस्तानी आयूबशी झालाय.
काही वर्षांपूर्वी दाऊदची छोटी मुलगी मारिया हिचा आजारपणामुळं मृत्यू झाला.मोईन इब्राहिम कासकरनं विदेशातून मॅनेजमेंटची पदवी मिळवली. 25 सप्टेंबर 2011 ला लंडनच्या मोठ्या उद्योगपतीची मुलगी सानिया हिच्याशी मोईनचा निकाह झाला. मोईनला ऐषोआरामातलं जीवन आवडत होतं. असं असताना अचानक मौलाना बनण्याचं कारण काय? हे पचवणं थोडं अवघड झालंय.
यामागचं सत्य शोधण्याचा खटाटोप गुप्तचर यंत्रणा करतायत. पण इक्बाल कासकरच्या या नव्या गौप्यस्फोटामुळं सगळ्यांचीच झोप उडालीय, एवढं नक्की.