मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झी 24 तासला मुलाखत दिली. झी 24 तासचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली, यात त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. यापूर्वी ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्यावर देखील अजित पवार दिलखुलास बोलत होते.
यात धनंजय मुंडे यांना तुम्हीच भाजप पक्षातून फोडलं? असा प्रश्न अजित पवार यांना आशिष जाधव यांनी केला, त्यावर अजित पवार यांनी विस्तृतपणे सांगितलं की, धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत कसे आले.
अजित पवार यावर बोलताना म्हणाले, 'पंडीतअण्णा मुंडे आज हयात नाहीत. पण तरीही सांगतो, धनंजय मुंडे यांच्या घरात अंतर्गत संघर्ष वाढत होता. पंडीतअण्णा आणि धनंजय मुंडे यांनी आम्हाला भाजप सोडायचा आहे', असं सांगितलं.
'पण तरी देखील आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही एकत्र राहा, तुमचं घर फुटू देऊ नका. संयमाने घ्या', असा सल्ला मी पहिल्यांदा दिला.
'या गोष्टीला एक ते दीड वर्ष झालं, यानंतर पंडितअण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी शरदपवार साहेबांची पुण्यात भेट घेतली. पवारसाहेबांनी देखील त्यांना असंच सांगितलं की, तुम्ही एकत्र राहा, घरातले वाद घरातच ठेवा, मार्ग निघेल'.
'पण यावर पंडीतअण्णा मुंडे यांनी सांगितलं, आम्ही वर्षभरापासून थांबलो आहोत, आम्हाला राष्ट्रवादीतच यायचं आहे, आम्हाला पक्ष सोडायचा आहे, आणि एवढं सांगूनही यावर तुम्ही काही निर्णय देत नसाल, तर आम्हाला काँग्रेस पक्षात जावं लागेल, असं उत्तर पंडीतअण्णा आणि धनंजय मुंडे यांच्याकडून आलं.
यानंतर अखेर राष्ट्रवादी धनंजय मुंडेंच्या प्रवेश कार्यक्रमाला मी हजर राहिलो', असं अजित पवार यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.