मुंबई : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या ४ नेत्यांना भाजपने काढून टाकलं आहे. विशेष म्हणजे भाजपा उमेदवाराच्या विरोधात निवडणुक लढणाऱ्यांवरच ही कारवाई करण्यात आली आहे.
तुमसरचे बंडखोर उमेदवार चरण वाघमारे, मीरा भाईंदरच्या गीता जैन, चिंचवडमधून बंडखोरी केलेले बाळासाहेब ओव्हाळ आणि लातूरच्या अहमदपूरचे दिलीप देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ केलं आहे. तर बंडखोरी केलेले पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी आपणहून राजीनामा दिला आहे. मात्र शिवसेना उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकलेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपाचा हाच युतीधर्म आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
शिवसेनेविरोधात भाजपकडून कल्याण पश्चिममधून नरेंद्र पवार, उरणमधून महेश बालदी आणि कागलमधून समरजित घाटगे यांनी बंडखोरी केली आहे. हे तिन्ही नेते शिवसेना उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या नेत्यांबाबत भाजप काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.