मुंबईच्या 'या' भागांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का?

Mumbai News : मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं असंख्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं वेळीच पाण्याचं नियोजन करा.   

सायली पाटील | Updated: Dec 6, 2023, 08:11 AM IST
मुंबईच्या 'या' भागांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का?  title=
water shortage in south mumbai latest update

Mumbai News : यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण फारसं समाधानकारक नसल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाणीप्रश्न डोकं वर काढू शकतो ही वस्तूस्थिती सध्या सर्वांनाच ठाऊक आहे. यातही मुंबईसारख्या शहरांमध्ये हा पाणीप्रश्न आता मोठ्या अडचणी निर्माण करताना दिसत आहे. जलवाहिन्यांची कामं, जलाशयांची पाणी आणि त्यातच पावसाचं प्रमाण या साऱ्या गोष्टींमुळं मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाण्यामध्ये (Thane) पाणीकपात कमीजास्त प्रमाणात लागू करण्यात येते. आता त्यात आणखी भर पडणार आहे ती म्हणजे शहराच्या मुख्य भागातील पाणीपुरवठा बंद असण्याची. 

दक्षिण मुंबईत असणाऱ्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीबाबतच्या निर्णयासाठी पालिकेची एक समिती गुरुवार (7 डिसेंबर) या जलाशयाची पाहणी करणार आहे. या प्रक्रियेसाठी जलाशयाचा एक भाग रिकामा करणं अपेक्षित असेल. ज्यामुळं शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार 

कोणकोणत्या भागात बंद असे पाणीपुरवठा? 

दक्षिण मुंबईतील कफ परेड, आंबेडकर नगरमध्ये नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर, नरिमन पॉइंट आणि जी. डी. सोमाणी भागात पाणीपुरवठ्यात 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. पुढे मिलिट्री झोनमधील पाणीपुरवठ्यात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. गिरगाव, मुंबादेवी, नाना चौक, ताडदेव, ग्रॅंट रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना 10 टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागेल. पेडर रोड येथील पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येईल. तर, वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी भागात 10 टक्के पाणीकपात करण्यात येईल. 

जलाशयाचा इतिहास... 

जवळपास संपूर्ण दक्षिण मुंबईला मलबार हिल जलाशयाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. तब्बल 136 वर्षे जुनं असणारं हे जलाशय 1887 मध्ये हॅंगिंग गार्डन म्हणजे फिरोजशाह मेहता उद्यानाखाली बांधण्यात आलं होतं. याच जलाशयाच्या पुनर्बांधणीचा विषय आता प्रशासनानं विचाराधीन घेतला असून, त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात 389 वृक्ष बाधित होणार आहेत. तर, हे उद्यानही सात वर्षे बंद ठेवावं लागणार आहे. ज्यामुळं या उद्यानाच्या पुनर्बांधणीला इथं राहणाऱ्या रहिवाशांसह पर्यावरणप्रेमींनीही विरोध केला आहे.