कोरोना रिपोर्ट येईपर्यंत थांबा...; राम कदमांनी शेअर केला पोलिसाचा व्हिडिओ

पोलिसाला रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आला.

Updated: Jun 7, 2020, 03:02 PM IST
कोरोना रिपोर्ट येईपर्यंत थांबा...; राम कदमांनी शेअर केला पोलिसाचा व्हिडिओ title=

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. जनतेसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. अशाच एका श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या पोलिसाचा व्हिडिओ राम कदम यांनी ट्विट केला आहे. कोरोना रिपोर्ट येईपर्यंत पोलिसाचा जीव भगवान भरोसेच असणार का, असा सवाल करत राम कदम यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. 

मुंबईतील एका पोलिसाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र अनेक रुग्णालयं फिरुनही त्यांना एकाही रुग्णालयात भरती करण्यात आलं नाही. कोरोना रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहाण्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. पोलिसाला रुग्णालयात प्रवेश देण्यात आला नाही. कोरोना रिपोर्ट येईपर्यंत थांबण्याचं सांगत, कोरोनाच्या धास्तीने प्रवेश नाकारण्यात आला.

मुंबई दलात असलेल्या, दोन महिन्यांपासून जनतेची सेवा करत असलेल्या एका पोलिसाला चार दिवसांपूर्वी अचानक ताप आला. डॉक्टरांनी कोविडची लक्षणं नसल्याने रक्त तपासणी करण्यास सांगितलं. त्यात टायफॉईड झाल्याचं समजलं. टायफॉईडवर चार दिवसांपासून इलाज सुरु आहेत. मात्र त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने घाटकोपरमधल्या अनेक रुग्णालयांमध्ये त्यांना नेण्यात आलं, मात्र कोणीही घ्यायला तयार झालं नसल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.

श्वास घ्यायला अधिक त्रास होत असल्याने रात्री खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी केली. रात्रभर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मात्र कोणतंही रुग्णालयं त्यांना घेत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कोविडचे रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना रुग्णालयात घेणार नाही असं सांगण्यात येतंय. अशा परिस्थितीत जीवाचं बरं-वाईट झालं तर कोण जबाबदार असा सवालही पोलिसांच्या कुटुंबियांकडून विचारला जात आहे. याबाबत महापौरांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे.