वाधवान कुटुंबियांना शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत रुजू

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरजिल्हा प्रवासास बंदी होती. मात्र, वाधवान कुटुंबासह २३ जणांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. 

Updated: May 18, 2020, 04:25 PM IST
वाधवान कुटुंबियांना शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत रुजू title=

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरजिल्हा प्रवासास बंदी होती. मात्र, वाधवान कुटुंबासह २३ जणांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र दाखवले होते. 

अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबियांना दिलेलं पत्र, कोण आहेत 'ते' २३ जण

ही बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी यावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. अखेर राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना १० एप्रिलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. चौकशी समितीने अमिताभ गुप्ता यांना निर्दोष ठरवले. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रधान सचिव पदावर रुजू करुन घेण्यात आल्याचे समजते.

मात्र, आता महिनाभरानंतर अमिताभ गुप्ता पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले आहेत. भाजपकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती होणे म्हणजे वाधवान बंधुंना सरकार किंवा सरकार चालवणाऱ्यांकडूनच पास देण्यात आला होता, हे स्पष्ट होते. हे आघाडी सरकार आहे का वाधवान सरकार? या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
वाधवान बंधू हे येस बँक, DHFL घोटाळ्यातील आरोपी आहेत. या सगळ्या प्रकारानंतर वाधवान बंधूंसह त्यांच्यासोबतच्या लोकांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि त्यांचे भाऊ धीरज यांना पाचगणीवरून महाबळेश्वरला आणण्यात आले. यानंतर राज्य सरकारने वाधवान कुटुंबीयांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयला विनंतीही केली होती.