मुंबई : शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, यासंदर्भात राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं, मात्र मी असं काही म्हणालोच नाही, हा सांस्कृतिक खात्याचा विषय आहे, असं राजनाथ सिंह म्हणाल्याचा दावा विनोद तावडेंनी केला आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही असं निक्षून सांगितल्याचा दावा शिवसेनेनं केलाय.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या काही खासदारांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली, आणि आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. मात्र त्यांनी असमर्थता दर्शवली. जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य 30 भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल. त्यामुळे हे शक्य नसल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचे शिवसेनेचे खासदार सांगत आहेत.