वाडिया रुग्णालयाच्या सीईओंसहीत अनेकांना डबल पगार, प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

निधीची कमतरता असताना काही कर्चमाऱ्यांना डबल पगार कसा काय दिला जातो?

Updated: Jan 14, 2020, 11:46 AM IST
वाडिया रुग्णालयाच्या सीईओंसहीत अनेकांना डबल पगार, प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात title=

मुंबई : वाडिया रुग्णालयात डबल पगाराचा मुद्दा महापालिकेनं उपस्थित केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. वाडियाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांचाही डबल पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. डबल पगाराचा मुद्दा  आत्ताच का काढला गेला? असा सवाल त्यांनी केलाय. वेतनासह सर्व निर्णय ट्रस्टचं बोर्ड ठरवतं आणि या बोर्डवर पालिकेचे प्रतिनिधीही असतात, असं बोधनवाला यांचं म्हणणं आहे. त्यांच्या सहमतीनंच हे निर्णय होत असल्याचा दावाही बोधनवाला यांनी केलाय. 

पुरेसा निधी नसल्यामुळे मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात अवकळा सुरू असताना वाडियातल्या अनेक वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दोन्ही रुग्णालयांमधून डबल पगार सुरू आहे. वाडिया रुग्णालयाचे सहा कर्मचारी दोन्ही रुग्णालयातून वेतन आणि मानधन घेत असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तसंच डबल पेन्शन घेणारे १० कर्मचारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. निधीची कमतरता असताना काही कर्चमाऱ्यांना डबल पगार कसा काय दिला जातो? असा प्रश्न उपस्थित होतोय. अशा अनेक प्रकारच्या अनियमितता वाडिया रुग्णालयात असल्याचंही काकाणी यांनी सांगितलंय.

दरम्यान, वाडिया रुग्णालयाचं प्रकरण आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आलंय. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीला वाडियाचे ट्रस्टी, मुंबईचे महापौर आणि संबंधीत अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.