मुंबई : नवनियुक्त कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते कुलगुरू (प्र.) डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रोफेसर सुहास पेडणेकर यांना कुलगुरू पदाचा पदभार सोपविला. याप्रसंगी प्र-कुलगुरू (प्र) डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव(प्र.) डॉ. दिनेश कांबळे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे, वित्त व लेखा अधिकारी (प्र.) डॉ. कविता लघाटे, विविध शाखेचे अधिष्ठाता यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिपक मुकादम, प्रा. डॉ. गौतम गवळी यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक २७ एप्रिल, २०१७ रोजी मा. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रोफेसर सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली होती.
व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करतांना कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाला ज्ञानदानाची उज्वल, ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. मागील १६० वर्षांपासून विद्यापीठाने ज्ञानदानाचा हा वारसा अविरतपणे जोपासला असून ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी हा या प्रक्रियेतील केंद्रबिंदू असून विद्यार्थ्यांना अधिकाअधिक सोयी-सुविधा देण्याबरोबरच विद्यापीठासमोरील आव्हानांना समोर जाण्याची माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ही जबाबदारी पार पाडत असतांना सर्वच घटकांतून सहकार्य लाभेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. निकालांना प्राथमिकता देऊन वेळेवर निकाल घोषित करणे, विद्यार्थ्यांना मार्कशिट उपलब्ध करुन देणे याबरोबरच विद्यापीठाच्या नॅक मुल्यांकनाची प्रक्रिया करुन घेणे याची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी सांगितले.