यापेक्षा सुंदर Valentine Gift असूच शकत नाही, पत्नीने पतीला दिलं नवं आयुष्य

संपूर्ण जगभरात 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला. पण एका पत्नीने आपल्या पतीसाठी दिलेलं गिफ्ट आतापर्यंतच सर्वात अमुल्य गिफ्ट ठरलं आहे

Updated: Feb 15, 2023, 04:47 PM IST
यापेक्षा सुंदर Valentine Gift असूच शकत नाही, पत्नीने पतीला दिलं नवं आयुष्य title=

Valentine Day : संपूर्ण जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. कुणी गुलाब देऊन तर महागड्या गिफ्ट देऊन हा दिवस साजरा केला. पण मुंबईत एका पत्नीने आपल्या पतीला व्हॅलेंटाईन (Valentine) दिनानिमित्त दिलेलं गिफ्ट हे सर्वात अनमोल असचं आहे. आपल्या पतीला तीने नवं आयुष्य दिलं. या अनोख्या गिफ्टचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईतल्या (Mumbai) कांदिवली इथ राहणाऱ्या शिवानी मित्तल या महिलेने आपला पती 48 वर्षीय तनूज मित्तलला आपली किडनी दिली. व्हॅलेंटाईनच्या दिवशी शिवानीने पतीला किडनी देत नवं जीवन दिलं. मधुमेहामुळे तनुजच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे तो गेल्या चार वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत होता. त्यातच कोरोना संक्रमण आणि हाय ब्लड प्रेशरमुळे तनुजची प्रकृती आणखीनच बिघडली. किडनी (Kidney) न बदल्यास तनुजच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. डॉक्टरांनाही अधिक प्रतीक्षा करु शकत नसल्याचं शिवानीला कळवलं.

शिवानीने घेतला मोठा निर्णय
तनुजची बिघडत जाणारी प्रकृती पाहता पत्नी शिवानीने मोठा निर्णय घेतला. तनुजला आपली किडनी देण्याचा निर्णय शिवानीने घेतला. शिवानीच्या निर्णयाला तिच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिला. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईनच्या दिवशीच नानावटी मॅक्स सुपर स्पेश्यालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण (Kidney Transplant) शस्त्रक्रिया पार पडली.

शिवानीच्या निर्णयाचं कौतुक
शिवानीने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. किडनी प्रत्यारोपण डॉक्टरांनी हे प्रेम, शक्ती आणि मानवतेचं उत्तम उदाहर असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड झाल्यामुळे तनुजच्या फुफ्फुसांत संक्रमण झालं होतं, त्यामुळे तीन वेळा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर चौदा तारखेली अखेरी ही प्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेच्यावेळी तनुजचं ब्लड प्रेशर पुन्हा वाढलं होतं, पण डॉक्टरांच्या मदतीने शिवानीनेदेखील तनुजला धीर दिला.

तनुज-शिवानीच्या लग्नाला पंचवीस वर्ष
तनुज आणि शिवानी मित्तलच्या  लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. शस्त्रक्रियेनंतर आता तनुजची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांनी सांगितलंय. व्हॅलेंटाईनच्या दिवशीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली हा सुखद योगायोग असल्याची भावना शिवानाने व्यक्त केली. माझ्या पतीला मी वाचवू शकले ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असल्याचंही शिवानीने सांगितलं.

धनबादमध्येही अशीच कहाणी
किडनी प्रत्यारोपणाची अशीच एक घटना धनबाद इथं समोर आली आहे. इंदरपाल सिंह आणि पत्नी सतबिंदर कौर यांच्या लग्नाला दोन महिने झाले नाहीत तोच पत्नी सतबिंदर कौरच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. पण इंदरपाल सिंहने पत्नीच्या मागे भक्कम उभं राहियचं ठरवलं. पती इंदरपालने किडनी दान (Kidney Donate) करण्याचा निर्णय घेतला. रक्तगट आणि डीएनए वेगवेगळे असूनही देखील मोठी जोखीम पत्करून इंदरपालने किडनी दान केली.

नवी मुंबईत अवयव दान
नवी मुंबईत खारघरमधील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अनोखा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. 2 जोडप्यांनी आपल्या जोडीदारांना अवयव दान करुन हा व्हॅलेंटाईन साजरा केला. अवयवरुपी गिफ्ट देणाऱ्या या जोडीदारांचं कौतुक होतंय.