अनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Updated: Jun 9, 2020, 11:20 AM IST
अनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा title=
संग्रहित छाया

मुंबई : अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, बस पकडण्यासाठी मोठी झुंबड दिसून येत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे कठिण होत आहे. मोठ्या गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

जवळपास तीन महिन्यांचे लॉकडाऊन शिथिल झाल्यांनंतर सोमवारपासून नागरिकांनी आपले कामाचे ठिकाण गाठण्यास सुरुवात केली आहे. मात्र लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचा संपूर्ण ताण मुंबई महापालिकेच्या बेस्ट बसवर आला आहे. 

वसई-विरारमधून मुंबईत जाणाऱ्यांना बेस्ट बसे कमी पडत असल्याने नागरिकांना आपले कामाचे ठिकाण गाठण्यासाठी तासंतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे या गर्दीत ताटकळत राहण्यापेक्षा अनेकांनी माघारी परतण्यासाठी पुन्हा घरचा रस्ता धरल्याचे पाहायला मिळाले. वसई-विरारमधून मुंबईत जाणाऱ्या बेस्ट बसेसची सेवा अपुरी ठरत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, लोकल बंद असल्याने कल्याण एसटी डेपोत लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे दिसत आहे. नेहमीप्रमाणे धक्काबुक्कीचे प्रकार घडत असल्याने वाद-वाद प्रसंग ओढविण्याची शक्यता अधिक आहे. अनलॉक-१ नुसार कालपासून सर्व कार्यालये सुरू झाल्याने कामावर जाण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. मात्र लोकलसेवा बंद असल्याने या लोकांनी आपला मोर्चा एसटी डेपोकडे वळवला असून कल्याण एसटी डेपोमध्ये आज सकाळी भयानक गर्दी पाहायला मिळाली.