Education News : जागतिक स्तरावर वाढती स्पर्धा आणि या स्पर्धेतूनच एकंदर मिळणाऱ्या संधी हे संपूर्ण चित्र पाहता नुकताच विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यूजीसीच्या परवानगीमुळे महाविद्यालयात वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहेत. परदेशी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे देशातील विद्यापीठांना येत्या शैक्षणिक वर्षापासून द्विवार्षिक प्रवेश प्रक्रिया घेण्यास परवानगी देण्यात आली असून, पुणे विद्यापीठासह खाजगी शिक्षण संस्थांनाही यामुळं फायदा होणार आहे.
पुणे विद्यापीठाचे अधिकार मंडळ आणि विद्या परिषदेकडून या निर्णयासंदर्भातील चर्चा करून नंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, जुलै- ऑगस्ट आणि जानेवारी- फेब्रुवारी अशा महिन्यांमध्ये दोन वेळा प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे. युजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी याविषयीची माहिती दिली.
नव्या निर्णयानंतर भारतातील विद्यापीठांना दोनदा प्रवेश मिळण्याची तरतूद केल्यानंतर याचा थेट फायदा विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांना होणारा उशीर आरोग्य किंवा तत्सम एखादा अचडणीचा प्रसंग किंवा इतर काही कारणांमुळं विद्यार्थ्यांना जुलै- ऑगस्टच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान अभ्यासक्रमात प्रवेश घेता आला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना जानेवारी- फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश मिळवणं सोपं ठरेल.
महत्त्वाची बाब म्हणजे विद्यापीठांना वर्षातून दोन वेळा प्रवेशाच्या निर्णयाची सक्तीनं अंमलबजावणी करावी लागणार नाहीय. त्यामुळं ज्या विद्यापीठांकडे आवश्यक पायाभूत सुविधा, शिक्षक आणि अध्यापनासाठीचे वर्ग नाहीत त्यांच्यावर कोणतीही सक्ती नाही. पण, पायाभूत सुविधा असल्यास त्या विद्यापीठांनी मात्र या निर्णयाचा विचार करण्यास हरकत नाही असं सांगण्यात आलं आहे. नवनवीन क्षेत्रांमध्ये शिक्षण घेत पुढे जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यूसीजीच्या या निर्णयामुळं फायदा होणार आहे.