मुंबई : लोकसभा निवडणुकीआधीच युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. युतीबाबत भाजपा-शिवसेनेत कसलीही खळखळ नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. यावेळी ठरलेल्या पद्धतीनुसार मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी. यात उपहासात्मक काहीच नाही, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा अयोध्येतील राममंदिराचा राग आळवला. मी बयानबाजी केलेली नाही. तर तमाम हिंदूंच्या वतीनं बोलतो आहे. विधानसभा निवडणुकीआधी शक्य झाल्यास अयोध्येला पुन्हा जाणार, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही. तर वृक्षतोडीला विरोध आहे, अशा शब्दांत त्यांनी आरेबाबतची भूमिका ही मांडली.
दोन्ही पक्ष बैठकांवर बैठका घेतंय. भाजपा आणि शिवसेनेनं वेगवेगळ्या बैठका बोलावल्या आहेत. अमित शाहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची ही पूर्व तयारी असण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची मुंबईत प्रदेश कार्यालयात बैठक झाली. शिवसेना भाजपमध्ये फॉर्म्युलावर सहमती होत नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. भाजपचा फॉर्म्युला शिवसेनेने फेटाळला आहे. त्यामुळे युतीतला तणाव चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचं बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासहल पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, निलम गोऱ्हे, दादा भुसे, रामदास कदम, रविंद्र वायकर, दिवाकर रावते, अनिल देसाई, गुलाबराव पाटील, विजय शिवतारेही उपस्थित होते.