मनसेच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगाला माहिती आहे.

Updated: Feb 9, 2020, 10:47 PM IST
मनसेच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले... title=

मुंबई: पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लिम समाजाला फटकारले. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका आणखीन प्रखर होत जाणार, हे स्पष्ट झाले. 

राज ठाकरे यांचा सीएए/एनआरसीला जाहीर पाठिंबा

साहजिकच राजकीय वर्तुळात या सगळ्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या या शक्तीप्रदर्शनाबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही थेट भाष्य करणे टाळले. मात्र, आमचे हिंदुत्व शुद्ध आहे. त्यामुळे आम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगाला माहिती आहे, असेही उद्धव यांनी म्हटले. 

मोर्चे काढून कोणाला ताकद दाखवताय; राज ठाकरेंचा मुस्लिमांना सवाल

आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात शिवसेना आमदारांची बैठक  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदारांना सीएए आणि एनआरसीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत NRC लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी आजच्या सभेत केंद्राने तात्काळ CAA आणि NRC ची अंमलबजावणी करावी, असा आग्रह धरला. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.