मुंबई: 'शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरू आहेत, असे सांगतानाच भीमा-कोरेगाव दंगलीने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. दलित संघटनांनी सर्वत्र जाळपोळी करूनही महाराष्ट्रातील इतर वर्गाने संयम राखला त्याचे अनेकांना वाईट वाटले, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
'एक‘पगडी’ राजकारण' या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामनामध्ये एक लेख लिगहीला आहे. या लेखात त्यांनी पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी केलेल्या भाषणावर आणि याच कार्यक्रमात केलेल्या पगडी राजकारणावर भाष्य केले आहे. पवारांचे भाषण आणि कृती यावर कडक टीका करताना 'राष्ट्रवादीच्या स्थापना मेळाव्यात शरद पवार यांनी मन मोकळे केले आहे. मन मोकळे करण्यासाठी त्यांनी विषय निवडला आहे तो भीमा-कोरेगाव दंगलीचा. या प्रकरणाशी ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर सरकार कारवाई करीत असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे. भीमा-कोरेगावचे उद्योग नक्की कुणाचे हे सगळय़ांना ठाऊक असल्याची पुडीदेखील पवारांनी सोडली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. दलित संघटनांनी सर्वत्र जाळपोळी करूनही महाराष्ट्रातील इतर वर्गाने संयम राखला त्याचे अनेकांना वाईट वाटले. जातीयवादी नेत्यांच्या चिथावणीखोरीस ‘मराठी’ जनता बळी पडली नाही. यालाच महाराष्ट्रीयपण म्हणावे लागेल', असे म्हटले आहे.
पवारांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण त्यांचे राजकारण महाराष्ट्राचे समाजमन अस्थिर करीत आहे. फुले, आंबेडकर, शाहूंच्या महाराष्ट्रात जातीय राजकारण ज्या पद्धतीने ‘रटरटू’ लागले आहे व त्या रटरटत्या रश्शातील हाडे राजकीय पुढारी चघळताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दुभंगल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीच्या पुण्यातील मेळाव्यात क्रांतिवीर छगन भुजबळ यांच्या डोक्यावर महात्मा फुले यांचे पागोटे घातले, तर शरद पवार यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तो जाणीवपूर्वक हाणून पाडला. हे ‘पगडी’नाटय़ जणू ठरवून एका विशिष्ट समाजाला संदेश देण्यासाठीच घडवून आणले, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी सामनातून केला आहे.