शिवसेनेत आता धनुष्यबाणासाठी लढाई, धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा ?

धनुष्यबाणावरून शिवसेनेत ठाकरे विरूद्ध शिंदे असा संघर्ष 

Updated: Jul 8, 2022, 06:12 PM IST
शिवसेनेत आता धनुष्यबाणासाठी लढाई, धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा ? title=

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) 40 आमदार सोबत नेले आणि थेट मुख्यमंत्री झाले. यामुळे आता संपूर्ण शिवसेनाच संकटात सापडलीय. 70 टक्के आमदारांनी बंड केल्यानंतर आता नगरसेवकांचे जत्थेच्या जत्थे शिंदेंना जाऊन मिळतायत. अनेक खासदारही शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. 

या पार्श्वभूमीवर आता खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार, याची चर्चा सुरू झालीये. ही लढाई अर्थातच शिवसेना स्टाईलनं रस्त्यावर होणार नसून ती कायद्याच्या चौकटीत लढवली जाणार. मात्र यात शिंदे धनुष्यबाण नेतील की काय हे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसैनिकांना केलेल्या कथित आवाहनवरून दिसतंय. 

उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन?
कायद्याच्या लढाईत अपयश आलं तर गाफील राहू नका. नवं चिन्ह मिळेल त्या चिन्हाची तयारी ठेवा. चिन्ह कमी काळात घरोघरी पोहोचवण्यासाठी कंबर कसा, असं ठाकरेंनी सांगितल्याचं समजतंय. 

मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी थेट पत्रकार परिषद घेऊन घटनातज्ज्ञांचा हवाला देत शिवसेनेचा धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असा दावा केला.

शिवसेनेच्या चिन्हाची गोष्ट
शिवसेनेच्या जन्मापासून धनुष्यबाण हे चिन्ह नाही. धनुष्यबाणापूर्वी शिवसेनेनं वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढल्या आहेत.  1978ची विधानसभा निवडणूक शिवसेनेनं रेल्वे इंजिन या चिन्हावर लढवली. त्यानंतर काही काळ ढाल-तलवार, कप-पशी ही चिन्हंही पक्षाला घ्यावी लागली. मात्र 1989 साली धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आणि ते आजपर्यंत पक्षासोबत आहे. 

मात्र आता या धनुष्यबाणावरूनही शिवसेनेत ठाकरे विरूद्ध शिंदे असा संघर्ष सुरू झालाय. शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असला तरी चिन्हाचा निर्णय होईल तो निवडणूक आयोगात. 

शिंदेंच्या बंडामुळे गेल्या 30 वर्षापासून असलेलं ठाकरे, शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण मोडकळीला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही दीर्घकाळ चालणारी कायदेशीर लढाई आहे. धनुष्यबाण ठाकरेंकडे राहणार, शिंदेंकडे जाणार की चिन्ह गोठवलं जाणार हे निवडणूक आयोगापुढे कोण कसा आकड्यांचा खेळ मांडतो यावर अवलंबून असेल.