खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा दणका, अटक वॉरंट जारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने बजावलं वॉरंट

Updated: Jul 8, 2022, 05:09 PM IST
खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा दणका, अटक वॉरंट जारी title=

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आपली बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊतांनविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती. 

कोर्टानं समन्स बजावूनही राऊत कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यावरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रं सादर करून हे कंत्राट मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. 

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी आणि देखभालीच्या प्रकल्पात युवा प्रतिष्ठान या संस्थेने शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या युवा प्रतिष्ठान संस्था चालवतात.

तर कोणतेही पुरावे नसताना आपली बदनामी झाल्याचा आरोप मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊत यांना आता 18 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहून जामीन घ्यावा लागणार आहे.

कोर्टाने संजय राऊत यांना 4 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. पण राऊत किंवा त्यांचे वकिल सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यासाठी आम्ही अरज् दिला आणि तो न्यायालयाने मान्य केला अशी माहिती मेधा सोमय्या यांचे वकिल अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी दिली.

p>