सैफी बु-हानी ट्रस्टने विकत घेतल्या दाऊदच्या तिन्ही मालमत्ता

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव झाला आहे. दक्षिण मुंबईतील मालमत्ता सैफी बु-हानी ट्रस्ट विकत घेणार असल्याचं समजतंय.

Updated: Nov 14, 2017, 03:39 PM IST
सैफी बु-हानी ट्रस्टने विकत घेतल्या दाऊदच्या तिन्ही मालमत्ता title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव झाला आहे. दक्षिण मुंबईतील मालमत्ता सैफी बु-हानी ट्रस्ट विकत घेणार असल्याचं समजतंय.

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव केंद्रीय महसूल खात्यानं केलाय. हा लिलाव सैफी बु-हानी ट्रस्टनं जिंकल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दाऊदची प्रॉपर्टी कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याच्या रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या तिन्ही मालमत्तांचा ११.५० कोटीत लिलाव झाला असून सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंटने दाऊदच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत.

मुंबईत चर्चगेट इथल्या इंडियन मर्चंट चेंबर्सच्या इमारतीमध्ये मंगळवारी सकाळी या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. एकाच वेळी अनेक ठिकाणांवरुन जागांचा जाहीर लिलाव, ई-लिलाव आणि त्यासोबतच बंद लिफाफ्यात लावण्यात आलेली बोली अशा स्वरूपात हा लिलाव करण्यात आला. महसूल विभागानं प्रत्येक मालमत्तेसाठी एक आधारभूत किंमत ठरवली होती. 

याआधी देखील मुंबईमधील दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. १९९३ च्या मुंबई साखळी स्फोटातील दाऊद हा मुख्य आरोपी असून या स्फोटांनंतर तो पाकिस्तानात लपून बसलाय. या स्फोटात तब्बल २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० हुन आधी नागरिक जखमी झाले होते.