मुंबई : नाशिक शहरातून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं या मार्चचं आयोजन करण्यात आलंय.
नाशिकमधल्या गोल्फ क्लब मैदानातून हा मोर्चा निघालाय. साडे चारशे वाहनांमधून जवळपास २० हजार शेतकरी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. हा मोर्चा जसाजसा पुढे जाईल तसतसे महाराष्ट्रभरातले हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, तरुण या मोर्चात सहभागी होणार आहेत.
उद्या मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये हा मोर्चा पोहोचणार आहे. 25 जानेवारीला मोठी सभा आझाद मैदानात होणार आहे. राज्यातल्या 100 पेक्षा अधिक संघटनांचे शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलाय. शरद पवार हे स्वतः सोमवारच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.