मुंबई : अवघ्या ९ महिन्यांच्या मुलाचे यकृत खराब झाल्यानंतर मृत्यूशी झूंज देणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी जन्मदाती आईनेच स्वत:चं यकृत दान करत मुलाला जीवदान दिले. मुंबई सेंट्रल इथल्या वोक्हार्ड रुग्णालयात डॉक्टरांनी वयाने सर्वात लहान बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.
आपल्या अपत्याच्या मार्गात कोणतंही संकट आलं तरी आई त्या संकटाशी दोन हात करते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. पालघर जिल्ह्यातल्या घोलवड इथे राहणाऱ्या या राऊत कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आज मृत्यूलाही चकवा दिल्याचा आनंद आहे. काव्य या ९ महिन्यांच्या बाळाला यकृताचा बिलीअर आर्टेसिया हा आजार झाला होता. काव्य २ महिन्यांचा असताना त्याच्यावर मुंबईत एक शस्त्रक्रियाही झाली. पण ती अयशस्वी झाली. त्यात यकृताचही नुकसान झालं. त्यामुळे त्याची वाढ खुंटली.
त्यातच कावीळ झाल्यामुळे काव्यची स्थिती चिंताजनक झाली. यकतृत प्रत्यारोपणाशिवाय पर्यायच राहिला नाही. मात्र काव्यसाठी त्याची आई पुढे आली. आईने तिच्या यकृताचा काही भाग बाळाला दिला. १४ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर यकृताचं प्रत्यारोपण करण्यात आलं. या शस्त्रक्रियेचा खर्च रूग्णालयाकडे आलेल्या मदतीतून झालाय. पश्चिम भारतात पहिल्यांदाच एवढ्या लहान बाळावर यकृतच प्रत्यारोपण करण्यात आलं.