Ajit Pawar Vs Sanjay Raut : राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार या चर्चेमुळे राज्याच्या राकारणात खळबळ उडाली होती. राज्यात चर्चेला उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pwar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये देखील वादाची ठिणगी पडली आहे. यो दोन्ही नेत्यांमधील मतभेद आणखी टोकाला गेले आहेत. अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार करारा जवाब दिला.. त्यामुळं दोघांमधला सामना आणखी रंगणार आहे.
महाविकास आघाडीतल्या दोन बड्या नेत्यांमधला वाद आता आणखीच पेटला आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला महाविकास आघाडीचे नेतेच खतपाणी घालत असल्यानं अजित पवारांच्या संतापाचा बांध फुटला. राष्ट्रवादीतील संभाव्य फोडाफोडीबद्दल रोखठोकमधून समाचार घेणा-या संजय राऊतांनी आमची वकिली करू नका, असं अजितदादांनी ठणकावलं आहे.
दादांच्या या कानपिचक्या ऐकूनही शांत बसतील ते संजय राऊत कुठले. संजय राऊत यांनी देखील दादांच्या टीकेला मुँहतोड जबाब दिला आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं त्यांनी सुनावलं. या दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटण्याची हा काही पहिली वेळ नाही. याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून दोघांनी परस्परविरोधी मतं व्यक्त केली होती. पवार विरुद्ध राऊत यांच्यातला वादामुळं आता सत्ताधारी शिंदे गटाला टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे.
अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातल्या या वादावादीमुळं महाविकास आघाडीचं हसं होत आहे. एकीकडं वज्रमूठ घट्ट करण्यासाठी विभागवार सभा घेतल्या जात आहेत. तर, दुसरीकडं मविआ नेत्यांमध्येच वादाचा सामना पाहायला मिळत आहे. मात्र, या दोघांमधल्या वादाच्या ठिणगीमुळे महाविकास आघाडीत फुटीचा वणवा तर पेटणार नाही ना याकडेच सर्वांचं लक्ष लागंले आहे.
अजित पवारांच्या बंडखोरीवरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केले आहे. दोघांची इच्छा आहे मात्र गुण जुळत नाही. तेव्हा कोणती पुजा करावी लागेल हे ब्राह्मणाला विचारावं लागेल असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.