ठाणे: तुम्ही जर अजूनही लस घेतली नसेल किंवा घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर सावधान. तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे आता लसीचा डोस न घेतलेल्यांच्या प्रवाशावर गदा येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने ‘हर घर दत्तक ’उपक्रम हाती घेतला आहे. त्यापाठोपाठ आता लशीची एकही मात्रा घेतलेली नाही अशा नागरिकांना टीएमटीच्या बसमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असा सक्तीचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुम्ही जर लस घेतली नसेल तर तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही.
मुंबईमध्ये कोविड लसीच्या पहिल्या मात्रेचं 100 टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. आज सकाळी महापालिकेनं हे लक्ष्य पूर्ण केलं. दुपारी 12 वाजेपर्यंत शहरात 92 लाख 39 हजार 902 नागरिकांचं पहिल्या डोसाचं लसीकरण पूर्ण झालं.
59 लाख 83 हजार 452 लोकांनी आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट पार करणारं मुंबई हे देशातलं पहिलं महानगर ठरलंय. आता दुसरी मात्रा बाकी असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.